Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात आणखी एका ' कोव्हीड योद्धा ' चा बळी

: महिनाभरात दोन तलाठ्यांचा मृत्यू

सांगली ( राजेंद्र काळे)
       कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असताना अनेक कोव्हीड योद्धाना आपले प्राण गमवावे लागत आहेत. खानापूर तालुक्यात देखील भेंडवडे येथील तलाठी संजय पाटोळे यांच्या निधनानंतर आज प्रशासनाला दुसरा धक्का बसला असून कार्वे गावचे तलाठी सुभाष यादव ( मुळ गाव नागेवाडी) यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले. अवघ्या महिन्याभरात दोन तलाठ्यांचा कोरोनामुळे बळी गेल्याने प्रशासन चांगलेच धास्तावले आहे.
     खानापूर  तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडा ५४२ वर जाऊन पोचला आहे. तर दररोज या आकड्यात ५० ते ६० कोरोनाग्रस्तांची भर पडत आहे. अशावेळी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी हे मोठ्या धाडसाने लढा देत आहेत. परंतु दुर्दैवाने काही कोव्हीड योद्धांचा बळी गेल्याचे दिसून येते. सुमारे महिनाभरापूर्वी  भेंडवडे येथील  संजय पाटोळे या तलाठ्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता कार्वे गावचे तलाठी सुभाष यादव यांचा आज पहाटे कोरोना मुळे मृत्यू झाला.
     तलाठी सुभाष यादव यांचे मुळगाव नागेवाडी असून त्यांना दहा दिवसांपूर्वी कोरोना  झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता.  त्यानुसार सुरुवातीला ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर ओम श्री हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे तलाठी यादव यांना मिरजेतील भारती हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तलाठी सुभाष यादव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा परिवार आहे. तलाठी यादव यांनी विटा येथे चांगली सेवा बजावली होती. सध्या ते कार्वे येथे सेवा बजावत होते. त्यांच्या निधनामुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments