Daily Mahasatta

Daily Mahasatta

तडसर ग्रामपंचायतीकडून ऑक्सिजन मशीनची खरेदी

: गावातील कोरोना रूग्णांना उपचारासाठी मदत , ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम*

कडेगाव (सचिन मोहिते)
        तडसर (ता.कडेगाव) येथील ग्रामपंचायतीने आपल्या गावातील कोरोना बाधित रूग्णांना तातडीने ऑक्सिजनची गरज लागल्यास उपयुक्त असलेल्या पोर्टेबल ऑक्सिजन मशीन खरेदी केल्या आहेत. त्या पोर्टेबल ऑक्सिजन मशीन आज गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये प्रदान करण्यात आल्या.
         यावेळी लोकनियुक्त सरपंच हणमंतराव पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव पवार, पंचायत समिती विस्तार अधिकारी सुनील लोहार प्रमुख उपस्थित होते.
         सरपंच पवार म्हणाले, आज सर्वत्र कोरोना महामारीच्या साथीच्या रोगाने थैमान घातलेले आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणावर ताण आलेला आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने रूग्णालयात बेड, ऑक्सिजन व व्हेन्टीलेटरचा तुटवडा भासत आहे. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रार्दुभावामुळे रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होण्याचे प्रमाण मोठे आहे. ऑक्सीजन पातळी कमी झाल्याने श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे रूग्ण घाबरून त्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढत चालली आहे. ग्रामीण भागात रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत अशा रूग्णांना ऑक्सिजनचा मुबलक प्रमाणात पुरवठा होण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून उपाययोजना केली आहे.
           ते म्हणाले, सर्वांच्या सहकार्याने गावातील कोरोना नियंत्रणात असून रूग्ण संख्या ही आटोक्यात आहे. ग्रामपंचायतीने गावात वेळोवेळी औषध फवारणी केली आहे. घरोघरी आर्सेनिक अल्बम गोळ्या, मास्कचे वाटप केले आहे. आता ग्रामपंचायतीने दोन पोर्टेबल ऑक्सिजन मशीन खरेदी केल्या आहेत. त्या ऑक्सिजन मशीन गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास प्रदान करण्यात आल्या आहेत. यामुळे रूग्णाला गावातच विनामूल्य प्राणवायू मिळणार आहे. यामुळे होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रूग्णाला घरी जावून प्राणवायू देता येईल. तसेच कोव्हीड सेंटरला रूग्णाला बेड उपलब्ध होई पर्यंत त्याचे जीवन वाचण्यासाठी मदत होणार आहे. बाहेर गावातून येणाऱ्यांनी काळजी घ्यावी. सर्दी, ताप, खोकला असलेल्यांनी तातडीने उपचार करून घेवून आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. तसेच कोरोना प्रसार होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सरपंच श्री.पवार यांनी केले आहे.
          कार्यक्रमास उपसरपंच सुरेखा पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रविण पवार, काँग्रेस ओबीसी सेल तालुका अध्यक्ष समीर मुल्ला, संदीप पोळ, सिध्दार्थ पवार, किरण पवार, जितेंद्र मोहीते, आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. अश्विनी तारूख, आरोग्य सेविका गुजले, ग्रामसेवक सचिन कांबळे, संतोष माने (शिरगाव) यांच्यासह आशा सेविका, ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments