Daily Mahasatta

Daily Mahasatta

रोहित पाटील कोरोना पाॅझीटीव्ह, पालकमंत्री आणि खासदारांच्या संपर्कात आल्याने खळबळ

 

तासगाव,( संजय माळी)

        राज्याचे माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील व बंधू सुरेश पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर आमदार सुमन पाटील यांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली. दरम्यान काल तासगाव शहरात कोव्हीड हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने बरेच मातब्बर  नेते रोहित पाटील यांच्या संपर्कात आले होते, त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

        तासगाव तालुक्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. आमदार सुमन पाटील यांच्यासह घरातील अन्य दोघेजण गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात फिरत होते. तर मतदारसंघातील अनेक कार्यकर्तेही अंजनी येथे आमदार व  युवा नेते रोहित यांना भेटण्यासाठी येत होते.मतदारसंघातील दौरे व निवासस्थानाकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे आमदार सुमन पाटील यांच्यासह घरातील अन्य सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल काय येणार याकडे मतदारसंघासह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.

          दरम्यान, स्व. आबांच्या पत्नी  आमदार सुमन पाटील यांच्यासह अन्य सदस्यांचा कोरोना चाचणी अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये आमदार पाटील यांची चाचणी निगेटिव्ह आली. तर स्वर्गीय आर आर पाटील यांचे पूत्र रोहित आणि बंधु सुरेश पाटील यांचे अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत. विशेष म्हणजे काल बुधवारी तासगाव येथील कोव्हीड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी रोहित पाटील हे पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.


तासगाव - येथील कोविड सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत अशी गर्दी झाली होती. त्यामुळे रोहित पाटील अनेकांच्या संपर्कात आल्याचे सांगीतले जात आहे.
Post a Comment

0 Comments