Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोनाच्या संकटात मुख्याध्यापिकेचे अनोखे दातृत्व

पेठ : नवदांपत्याला संसारोपयोगी साहित्य भेट देताना वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ. शांता पाटील आणि श्री सुभाषराव पाटील.

पेठ ( रियाज मुल्ला)
         सुरूल (ता.वाळवा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ. शांताबाई पाटील यांनी आपले पती सुभाषराव विश्वनाथ पाटील यांच्या एकसष्ठी निमीत्त गरजू नवदांपत्याला सुमारे 30 हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य भेट देत अनोखे दातृत्व दाखवून दिले. त्यांच्या या दातृत्वाचे परिसरातून कौतुक होत आहे.
          सौ. शांता पाटील या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक ऋण आणि  नैतिक जबादारी माणून समाजातील उपेक्षीत, गरीब  विद्यार्थी दत्तक घेतात. त्यांची उच्च शिक्षणापर्यंतची जबाबदारी उचलून त्यांचे आधारवड बनतात. तसेच समाजातील वयोवृद्ध लोकांना व अनाथ मुलाना मायेचा आधार देत त्यांच्या गरजा भागवतात. तालूक्यातील ज्या गावात त्यांची नियुक्ति होईल त्या परिसरातील अशा वंचित गरजू  कुटुंबाचा शोध घेऊन त्याना जगण्याची उमेद देण्याचं काम करतात.
          नुकताच सौ. शांता पाटील यांचे पती सुभाषराव पाटील यांच्या एकसष्टीचा कार्यक्रम पार पडला. पण सामाजिक बांधिलकी जोपसणार्या मुख्याध्यापिका सौ. शांता पाटील यांनी कोरोनाच्या संकटामुळे या कार्यक्रमाचा डामडौल बाजूला ठेवून गरिब कुटुंबाला मदत करण्याविषयीचा विचार पती सुभाषराव यांच्या समोर मांडला. त्यांनी देखील सौ. शांता पाटील यांचे विचारानुसार आपली एकसष्टी साजरी न करता त्याचा खर्च गरिब कुटुंबाला मदत देण्यासाठी आनंदाने परवानगी  दिली. त्यानुसार  इस्लामपूर येथील अभियंता नगरमधील संजय शामराव वडार यांची कन्या चि.सौ. का. प्रियंका वडार हीच्या विवाह प्रसंगी दि 30 आॅगष्ट 2020 रोजी 30 हजार रुपये किमतीच्या संसार उपयोगी वस्तु भेट देऊन कोरोना काळात सामाजिक भान ठेवत अनमोल अशी मदत केली.
          सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे अनेकजण असतात. किंबहुना त्यांच्या चांगुलपणामुळेच प्रेम, माया, सामाजिक ॠणानुबंध, नैतिकता, जबाबदारी यासारखी जीवन मुल्ये अस्तित्वात आहेत. परंतु शिक्षण क्षेत्रात वरिष्ठ मुख्याध्यापिकेची जबाबदारी सांभाळत घरप्रपंचा, नोकरी आणि सामाजिक बांधिलकी अशी कसरत करत समाजाच्या उद्धारासाठी झटणार्या सौ. शांता पाटील या समाजासमोरील खर्या आदर्श आहेत. त्यांच्या कामाचे करेल तितके कौतुक थोडेच आहे. सौ. शांता पाटील यांनी मदत केलेल्या नवदांपत्याला सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा तसेच सौ. शांता पाटील  यांचे पती सुभाषराव पाटील यांना देखील एकसष्टी निमित्त महासत्ता परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा.


 

Post a Comment

0 Comments