जनता कर्फ्यू ऐवजी कडक लॉकडाऊन करा ; जत येथील तुकारामबाबांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

जत (नितीन टोणे )
         शहरांपाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असून जनता कर्फ्यू ऐवजी सर्वत्र कडक लॉकडाऊन करावा, अशी मागणी चिकलगी (भुयार) मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
         निवेदनात म्हंटले आहे, सांगली जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात कोरोना सारख्या महाभयानक रोगाचां खूप मोठ्या प्रमाणामध्ये संसर्ग वाढला आहे. दिवसेंदिवस शेकडो नागरिक या कोरोनाला बळी पडत आहेत. त्यातील काही जण मरण पावत आहेत. ज्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक 19 मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला होता. त्यावेळी 23 तारखेला कडक लॉकडाऊन व सर्व सीमा व आंतरराज्य सीमा सील करण्यात आल्या होत्या. रुग्णांची संख्याही फार कमी व मोजकीच होती. परंतु सध्याच्या घडीला परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे.
         रोज २० हजारच्या आसपास रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत. रोज एक हजार च्या आसपास रुग्ण आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सापडत आहेत. सदरील परिस्थिती खूप भयानक असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु त्याच्या उलट या गोष्टीला कोणी गांभीर्याने घेत नाहीत. सोशल डिस्टन्सचे पालन व्यवस्थित होताना दिसत नाही. किती तरी नागरिक विना मास्क फिरत आहेत. प्रशासनाचा कोणावर वचक नाही. अशा सर्व कारणांमुळे सध्याची कोरोना ची परिस्थिती खूप बिकट अवस्थेत आहे.
तरी सदर परिस्थितीला आळा घालण्यासाठी शहरी भागांमध्ये शंभर टक्के लॉकडाऊन व मास्क कंपल्सरी करणे आवश्यक आहे व ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींना गावातील नागरिकांना योग्य ती दक्षता घेण्यासाठी नियमावली तयार करावी व ग्रामपंचायत मधील पंधरावा वित्त आयोगातील तरतूद असलेल्या पन्नास टक्के रक्कमे मधून गावांमध्ये जंतुनाशक फवारणी सॅनटायझर च्या बॉटल, मास्क चे वाटप त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम व इतर औषधे वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आम्ही सर्व आपणास विनंती करत आहोत की वरील सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करावी व ही वाढत चाललेली कोरोनाची साखळी कमी करावी यासाठी लॉकडाऊनची गरज असल्याचे तुकाराम बाबा यांनी म्हटले आहे.

Post a comment

0 Comments