Daily Mahasatta

Daily Mahasatta

दिलीपभाऊ...मी तुम्हाला देव्हाऱ्यात पुजताना पाहिलंयसांगली ( राजेंद्र काळे)
         नेहमीप्रमाणे पत्रकार मित्र सचिन भादुले यांचा फोन आला. दिलीपभाऊ सांगलीला निघालेत तुम्ही जाणार आहे का ? थोडयाच वेळात ऑफिसची बॅग घेऊन मी विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचलो. दिलीपभाऊ यांनी स्मितहास्य करत नेहमीच्या शैलीत स्वागत केले. तासाभरात दैनिक महासत्ताच्या सांगली कार्यालयाच्या खाली रस्त्यावर पोहोचलो.  दिलीपभाऊ आणि स्कॉर्पिओ मधील सर्वांना मी ऑफिसला भेट देण्यासाठी त्यादिवशी  खूपच आग्रह केला. पण भाऊ म्हणाले, मला लवकर जावे लागेल....
       स्मितहास्याने ते सर्वांना आपलेसे करत...  
       दिलीपभाऊ आणि खानापूर तालुक्यातील सर्व पत्रकार मित्रांचे अत्यंत जिव्हाळयाचे संबंध. लेंगरे गावचे पत्रकार सचिन भादूले हे आम्हा सर्वांचा दुवा. दिलीपभाऊ यांची ओळख झाली आणि ते आम्हा सर्वांचे झाले. त्यांच्याभवती नेहमी दहा ते पंधरा कार्यकर्त्यांचा गराडा असत. समोर माणुस आला की त्याला केवळ स्मितहास्याने ते आपलासा करत. भाऊ मितभाषी होते. ते अत्यंत कमी बोलत पण शेतीसारखा विषय निघाला की त्यांच्यातील अभ्यासू वक्ता जागा होत. मित्रमंडळीशी दिलखुलास गप्पा मारणे हा देखील त्यांचा विशेष छंद होता.
        मी तुम्हाला...देव्हाऱ्यात पुजताना पाहिलंय
          : आमचे मित्र सचिन भादुले यांच्यासोबत माझ्या अनेकवेळा घरगुती विषयावर चर्चा होत. माझे विषय वेगळे असत मात्र भादुले साहेबांचा विषय दिलीपभाऊ यांच्यावर सुरू होत आणि त्यांच्यावर संपत. मला सुरवातीला त्यांचे ॠणानुबंध माहित नव्हते. नंतर समजले भादुले साहेब हे दिलीपभाऊंना गुरु, सखा, थोरले बंधु, मार्गदर्शक या सर्वच रुपात पाहत. मी एकदा सहज विचारल दिलीपभाऊ यांच्याशी तुमचा एवढा जिव्हाळा कसा? त्यांनी सांगितले गरिबीवर मात करत माझे शिक्षण पूर्ण झाले. पण नोकरी मिळत नव्हती. प्रचंड नैराश्य आले होते. कुठलीच दिशा दिसत नव्हती. अशावेळी दिलीपभाऊ ' समर्थ ' होऊन पाठीशी उभा राहिले. काळजी कशाला करतोस, जे करायचे ते झोकून देऊन कर. मिळेल ते काम प्रामाणिक कर. नाहीतर काय व्यवसाय करणार ते सांग, व्यवसायासाठी किती रक्कम लागणार ते सांग ? आणि एक नवीन सुरवात कर, असे सांगत समुद्रात भरकटलेल्या जहाजाला दिशा दाखवावी त्याप्रमाणे दीपस्तंभ होऊन त्यांनी आयुष्याला कशी दिशा दिली, हे भादुले यांच्याकडून ऐकताना दिलीपभाऊ मी तुम्हाला अक्षरशः मनाच्या देव्हार्यात पुजताना पाहिलंय.
          तुम्ही देवाला देखील आवडलात...
         दिलीपभाऊ तुम्ही राजकीय नेते होता, सामाजिक कार्यकर्ते होता, प्रगतशील बागायतदार होता, आदर्श पती आणि आपल्या पूत्रासोबत देखील  मित्रत्वाचे संबंध जोपसणारे चांगले मित्र होता. आपल्या अल्पायुष्यात लोकांना आपलं करण्याची जादू शिकून घेतलेले जादूगार होता. हे सगळं मिळविल्यानंतर देखील निर्मोही श्रीकृष्णाप्रमाणे हजारो सुदामांना सोबत घेऊन पुढे जाण्याची कला देखील तुम्हाला चांगलीच अवगत होती. हजारो लोकांनी तुमच्यावर प्रेम केले. पण त्या लोकांना सोडून तुम्ही आयुष्याच्या पुर्वाधातच स्वर्गवासी झाला. जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला असे का म्हंटले जाते याची देखील शिकवण तुम्ही जाताजाता दिली.
         गेलात ते परत न येण्याच्या वाटेने..
        वर्षभरापूर्वी आमचे मित्र सचिन भादुले यांचा  फोन आला दिलीपभाऊ सांगलीला निघाले आहेत तुम्ही जाणार आहात का ? त्यावेळी सुमारे तीन चार महिने दिलीपभाऊ वैद्यकीय उपचाराकरिता सांगलीला जात. माझी देखील दैनिक महासत्ताच्या जिल्हा प्रतिनिधीपदी निवड झाल्याने मला बसने रोज ये-जा करावी लागत. त्यामुळे दिलीपभाऊ स्कॉर्पिओ घेऊन सांगलीला निघाले की तुम्ही येणार का ? असे फोन करुन विचारत. त्या दिवशी देखील असाच फोन आला. मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचलो. भाऊंनी नेहमीच्या हसतमुख चेहर्याने स्वागत केले. गप्पा मारत आम्ही महासत्ताच्या राममंदीर चौक सांगली येथील कार्यालयाच्या खाली पोहचलो. आज ठरवलं होत. भाऊंना आपले ऑफिस नेऊन दाखवायचं. मी आग्रह केला. तुम्ही पाच मिनिट तरी ऑफिसला चला. परंतु तुम्ही सांगितले, मला डाक्टरांनी भेटीची वेळ दिली आहे. मला जावेच लागेल. मी पुन्हा आल्यानंतर निश्चित तुमच्या ऑफिसला येतो. दिलीपभाऊ..तुम्ही त्या दिवशी गेलात ते कधीच परत न येण्याच्या वाटेने. आज  तुमच्या आठवणी लिहिताना देखील डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि एक चांगला मार्गदर्शक, हितचिंतकाला पोरके झाल्याची जाणिव झाली.
      
   .   


       स्वर्गीय दिलीपभाऊ बागल ( लेंगरे ता. खानापूर, जि. सांगली) आपणास प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त
विनम्र अभिवादन.
      शब्दांकन
     राजेंद्र काळे
     दैनिक महासत्ता, जिल्हा प्रतिनिधी


प्रथम पुण्यस्मरण शनिवार
ता.२२ आॅगस्ट २०२०

टीप : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फुले वाहण्याचा कार्यक्रम घरगुती स्वरूपाचा होणार आहे.

 

Post a Comment

0 Comments