Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ शिवसेनेचे ' जोडे मारो ' आंदोलन


विटा : कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारताना जिल्हाप्रमुख संजय विभूते. यावेळी सतिश निकम, राजू जाधव, युवासेनेचे मिलिंद कदम , अमर कदम, आकाश माने उपस्थित होते.

सांगली (राजेंद्र काळे)
           मनागुत्ती जि. बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने हटविल्याबद्दल
आज विटा येथील चौंडेश्वरी चौकामध्ये शिवसेना विटा शहर, खानापूर तालुका आणि सांगली जिल्ह्याच्या वतीने कर्नाटक सरकारच्या विरोधात 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले.
काल मनागुत्ती जि. बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने रात्रीमध्ये हटवला होता. कर्नाटक सरकारला महाराष्ट्र विषयी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी एवढा द्वेष का आहे? कर्नाटक सरकार बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिकांच्या वर सातत्याने अन्याय करत आले आहे. त्यांचा आवाज दाबू पाहतेय. त्यांची मजल एवढी वाढली की या देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी काढला आहे.
             याघटनेचा शिवसेना सांगली जिल्ह्याच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करतो. बेळगाव जिल्हा महाराष्ट्रातील भाग असून बेळगाव जिल्ह्याचा महाराष्ट्र मध्ये समावेश व्हावा म्हणून अनेकांनी आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे. एक ना एक दिवस बेळगाव जिल्हा महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही हे कर्नाटक सरकारने लक्षात ठेवावे आणि मनागुत्ती गावातील काढलेला छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा त्याचठिकाणी लावावा. अन्यथा एकही कानड्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत अधिक तीव्र आंदोलन करणार असा इशारा जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी दिला आहे.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सतीश निकम शहर प्रमुख राजू जाधव, युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी मिलिंद कदम, अमर कदम, आकाश माने, प्रवीण डुबल, दिलीप महाडिक, बाबा मस्के, सचिन गुजरे , दीपक मुंगसे, योगेश खाडे, अधिक धडस, प्रसाद लिपारे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments