Daily Mahasatta

Daily Mahasatta

अजितदादा आणि पडळकर पुन्हा मैदानात...एसटी कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न सुटणार?    
 
सांगली ( राजेंद्र काळे)
        राज्यातील एसटी कामगारांच्या थकीत वेतनासाठी आम. गोपीचंद पडळकर यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. तर अर्थमंत्री अजितदादा पवार यांनीदेखील एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांना परिवहन मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने सोडविण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे दोघेही एसटी  कामगारांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपापल्या परीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
        राज्यातील एसटी महामंडळाच्या १ लाख १० कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गेल्या चार महिन्यात प्रलंबित आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला सुमारे २७० कोटी रुपये  खर्च येतो. मात्र लाॅकडाऊनच्या काळात एसटीची चाके थांबल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देखील थकले आहेत. त्यामुळे अनेक कर्मचारी रोजगारी म्हणून मिळेल ते काम करत आहेत. नुकताच इस्लामपूर आगारातील अमोल धोंडीराम माळी या मेकॅनिकने आत्महत्या केल्यामुळे थकीत वेतनाचा हा प्रश्न अधिक ज्वलंत बनला आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात ७५ टक्के पगार मे महिन्यात ५० टक्के पगार, एप्रिल महिन्यात पूर्ण पगार तर जून आणि जुलै महिन्यातील पगार अजून देणे बाकी आहे. त्यामुळे कामगारांची मोठी आर्थिक टंचाई झाली आहे.
      गोपीचंद पडळकर मैदानात उतरणार
      भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी महासत्ता सांगली न्यूज पोर्टलशी दूरध्वनीवरून संवाद साधला. आमदार पडळकर म्हणाले, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार न दिल्यामुळे हे कर्मचारी नैराश्यातून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. महाराष्ट्रासाठी ही लज्जास्पद बाब आहे. इस्लामपुरातील कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली आहे. मला एसटी कर्मचाऱ्यांचे फोन येत आहेत. आटपाडीसह जिल्ह्यातील कामगार रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. एसटी कामगारांच्या थकीत वेतनाचा  प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा प्रयत्नशील आहेत. शासनाने कामगारांना  थकीत वेतन  तातडीने  न दिल्यास रस्त्यावर उतरून आरपारची लढाई उभारण्यात येईल. तसेच आत्महत्या केलेल्या इस्लामपुरातील कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांना आधार  देणार आहे, अशी ग्वाही आमदार पडळकर यांनी दिली
        अजितदादांची कामगार संघटनेला ग्वाही 
       एका बाजूला थकीत वेतनासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी या लढ्यात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे काही एसटी कर्मचारी संघटनांनी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन थकित वेतनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लवकरच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या समवेत बैठक आयोजित करून हा प्रश्न आपण निकाली काढू अशी कामगार नेत्यांना ग्वाही दिली आहे.
      अजितदादा-पडळकर पुन्हा मैदानात
       विधानसभा निवडणुकीत अजितदादा विरुद्ध गोपीचंद पडळकर यांची बारामती मतदारसंघात झालेली लढत राज्यभरात गाजली. नुकतेच आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्यावर टीका केल्यामुळे पडळकर-पवार हा संघर्ष पुन्हा उफाळून आला. मात्र पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर हे दोघेही एकाच मागणीसाठी  मैदानात उतरत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रलंबित प्रश्न सोडवतात ?  की याच प्रश्नी आमदार गोपीचंद पडळकर मैदानात उतरून शासनाला कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्यास भाग पडतात ? याची उत्सुकता राज्यभरातील एसटी कामगारांना लागून राहणार आहे.


Post a Comment

0 Comments