फेसबुकवरील फसवणुकीचा नवा फंडा तुम्हाला देखील पडू शकतो महागात, पहा काय आहे हा फंडा ?

पेठ (रियाज मुल्ला )
             कोरोना काळात काम, धंदे, नोकरी, व्यवसाय यावर परिणाम झाल्याने ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसून येत आहेत. जर तुमच्या मित्राने सोशल मिडियातील फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून पैसे उसने मागितले तर खात्री केल्याशिवाय पैसे पाठवू नका, कारण तुमची फसवणूक होऊ शकते. प्रत्यक्ष संवाद साधूनच पैसे पाठवा. कारण ऑनलाइन फसवणुकीचे नवनवीन फंडे हॅकर शोधून काढत आहेत.
              सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठ येथील एका मेडिकल व्यावसायिकाचे फेसबुक अकाउंट हॅक करून फेसबुकच्या मित्राना चाट च्या माध्यमातून पैशांची मागणी करण्यात आली. मेडिकल व्यावसायिकच्या एका मित्राला फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून पाच हजार रुपये उसने तातडीने देण्याची विनंती केली. सुरवातीला मराठमोळा मित्र हिंदीत पैशांची मागणी करत होता. परंतु मेडिकल व्यवसाया शी निगडित असणारा त्यांच्या मित्राला सुरवातीला चाट करत असताना संशय आला नाही.
               काहीतरी व्यवस्था करून पैसे देण्याची तयारी दाखवली. मात्र संपूर्ण चाट हिंदी मध्ये करत असल्याने थोडासा संशय आला. त्याने थेट मित्राला फोन केला व पैसे का लागणार आहेत, अशी विचारणा केली. तर हि धक्कादायक महिती समोर आली. फेसबुक चे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले आहे. व त्यावरून हॅकरने अनेक लोकांना पैशांची मागणी केली होती. हे त्यांना फेसबुक चे मेसेंजर उघडताच लक्षात आले.त्या मेडिकल व्यवसायिकाने तात्काळ फेसबुक वर माझे अकाउंट हॅक केले असल्याची पोस्ट केली. मात्र त्या हॅकर ने तात्काळ ती पोस्ट डिलेट केली. मग मात्र त्यांनी शक्य होईल तितक्या जवळच्या मित्रा ना फोन करून याची कल्पना दिली अन फेसबुक अकाउंट बंद करून टाकले.
             फेसबुकच्या मेसेंजर च्या माध्यमातून मेसेज पाठवून मित्रांना पैसे मागण्याचे फंडे राज्यभरात घडत आहेत. अशा प्रकारच्या फसवणुकीला आपण देखील बळी पडू शकता. त्यामुळे मेसेंजर च्या माध्यमातून पैशाची मागणी केल्यास आपण पहिल्यांदा संबंधितांस फोन करून याबाबत विचारणा करणे आवश्यक आहे. अन्यथा आपली देखील फसवणूक होऊ शकते हे ओळखायला हवे.

Post a comment

0 Comments