Daily Mahasatta

Daily Mahasatta

टाळ, मृदुंग वाजला अन् ७० वर्षांचा प्रश्न सुटला


विटा  : तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याशी चर्चा करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख दत्तकुमार खंडागळे, कॉम्रेड उमेश देशमुख, अखिल भारतीय किसान सभेचे संघटक गोपिचंद सुर्यंवशी, अॅड विजय सुर्यवंशी, कॉम्रेड कांबळे व शासकीय अधिकारी.

: टाळकरी लाँगमार्चला अखेर यश
: सत्तर वर्षे रखडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला

सांगली ( राजेंद्र काळे)
          राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दाखवून दिलेल्या सत्याग्रहाच्या आंदोलनात किती ताकद आहे, याचा प्रत्यय नुकताच खानापूर तालुक्यातील लोकांना आला. करंजे या गावातील यादव वस्ती येथील रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी करंजे ते विटा असा टाळकरी लॉंग मार्च काढला. टाळ, मृदंग, वीणा घेऊन   ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत आंदोलक निघाले. रेवणगावापर्यंत दाखल  झालेल्या या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत हा रस्त्ता तातडीने करण्याचे आदेश तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी संबंधितांना  दिले आणि ७० वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली.
         करंजे ता. खानापूर येथील करंजे ते यादव वस्ती या दरम्यान गेल्या सत्तर वर्षात कोणत्याही लोकप्रतिनिधींनी रस्ता न केल्यामुळे आम्ही स्वातंत्र्यात  आहोत की पारतंत्र्यात आहोत? अशी भावना लोकांच्या मध्ये निर्माण झाली होती. दोन वेळा रस्ता मंजूर होऊन देखील तो केवळ कागदोपत्री पूर्ण झाला. रस्त्याचे पैसे कुठे गेले ? आणि रस्ता कुठे गेला?  याबाबत ग्रामस्थांना काहीच माहिती मिळाली नव्हती.
          त्यामुळे काल मंगळवार ता. ११ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे सांगली, कोल्हापूर संपर्कप्रमुख दत्तकुमार खंडागळे, कॉम्रेड उमेश देशमुख, अखिल भारतीय किसान सभेचे संघटक गोपिचंद सुर्यंवशी, अॅड विजय सुर्यवंशी, कॉम्रेड कांबळे नेतृत्वाखाली सुमारे शंभर ग्रामस्थांनी टाळ, मृदुंग, विणा हाती घेऊन ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत विटा शहराकडे प्रस्थान केले. काल मंगळवारी रेवणगावात मुक्काम करण्यात आला. सायंकाळी तहसीलदार शेळके यांनी  आंदोलन कर्त्याच्या शिष्टमंडळाला चर्चेचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार सायंकाळी सात वाजता तहसीलदारांच्या दालनात बैठक पार पडली.
          यावेळी करंजे ग्रामस्थांचा प्रश्न समजून घेत पंचायत समितीच्या शाखा उपअभियंत्यांना सदर रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच कोणी अडथळा आणला तर पोलिस बंदोबस्तात रस्त्याचे काम करून घ्या अशा सुचना संबंधीत विभागाला दिल्या. यावेळी भाई भानूदास सुर्यवंशी यांनी सत्तर वर्षापासूनची कागदपत्रे आणि पुरावे सादर करत यादव मळ्यातील लोकांची मागणी रास्त असल्याचे सांगितले. तहसिलदारांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत लोकांची मागणी  कायद्याला धरून असल्याचे सांगत कामास सुरूवात करण्याच्या सुचना केल्या.
       या बैठकीस विट्याचे पोलिस निरिक्षक रविंद्र शेळके,  बीडीओ संदिप पवार व शाखा अभियंत्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख दत्तकुमार खंडागळे, कॉम्रेड उमेश देशमुख, अखिल भारतीय किसान सभेचे संघटक गोपिचंद सुर्यंवशी, अँड विजय सुर्यवंशी, कॉम्रेड कांबळे आदी मंडळी उपस्थितीत होती. तसेच हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पालकमंत्री जयंत पाटील, राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू आणि अजित नवले यांंनी विशेष प्रयत्न केले.


करंजे ग्रामस्थानी काढलेला करंजे ते विटा टाळकरी लॉंग मार्च .


Post a Comment

0 Comments