Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

क्षारपड जमीन प्रश्नी शासनाचा मोठा निर्णय: मंत्री जयवंतराव पाटील


बोरगांव : येथे रेशन कार्ड वाटप करताना नाम.जयंतराव पाटील. समवेत माणिकराव पाटील, विष्णुपंत शिंदे, विजयबापू पाटील, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस.

इस्लामपूर (हैबत पाटील)
           क्षारपड जमिनी हा शेतकऱ्यांच्या समोरचा गंभीर प्रश्न असून या क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी राज्य सरकारने योजना हाती घेतली आहे. या योजनेत राज्य शासन ८० टक्के,तर लाभार्थी शेतकरी,व सहकारी पाणी पुरवठा संस्था प्रत्येकी १० टक्के खर्चाचा भार उचलणार आहेत. या योजनेचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याचा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.
       ना.पाटील यांनी बोरगांव, रेठरे हरणाक्ष या गावांना भेटी देवून या गावातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या हस्ते विशेष मोहिमेत तयार केलेल्या रेशन कार्डचे वाटपही करण्यात आले. राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, माजी अध्यक्ष विष्णूपंत शिंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासो पाटील, बी.डी.पवार, जि.प. सदस्य पै.धनाजी बिरमुळे,युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील,माजी अध्यक्ष संजय पाटील,महिला तालुकाध्यक्ष सौ.सुस्मिता जाधव, प्रातांधिकारी नागेश पाटील, तहसिलदार रविंद्र सबनीस, संचालक कार्तिक पाटील, दादासो मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
          नाम. पाटील म्हणाले,पूर्वी राज्य,केंद्र शासन,तसेच लाभार्थी शेतकरी,व सहकारी संस्थांच्या माध्यमातून क्षारपड जमिनी सुधारणा प्रकल्प राबविला जात होता. मात्र केंद्र शासनाने या योजनेचा निधी बंद केला आहे. राज्य सरकारने १९७४ चा अध्यादेश बदलून ही योजना जोमाने सुरू केली आहे. ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजना चालू करण्याच्या सूचना दिल्या असून पाऊसाच्या पाण्याने दुष्काळी भागातील तलाव भरण्याचा प्रयत्न आहे. रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिद्र, ताकारी या गावांच्या रेल्वे रुळाच्या पलीकडून डोंगराच्या बाजूने पाईप लाईन करून शेतीला पाणी पुरवठा केला जाणार आहे. यावेळी त्यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले.
            बोरगाव येथे बँकेचे संचालक माणिक पाटील,दुध संघाचे संचालक अशोक पाटील, अभिजित पाटील, शामराव वाटेगावकर,माजी सरपंच पै.विनायक पाटील, पै.विकास पाटील रेठरे हरणाक्ष येथे सरपंच कुमार कांबळे, उपसरपंच निलेश पवार,माजी सरपंच जे. डी मोरे, कृष्णेचे संचालक सुजित मोरे, उमेश पवार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a comment

0 Comments