Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोना पासून वाचण्यासाठी ' काय करा, आणि काय नको '...वाचा सांगलीचे प्रसिद्ध डाॅ. सुहास जोशी यांचा विशेष लेख

सांगली ( प्रतिनिधी)
       आजचा कोरोनाचा उद्रेक हा जुलै महिन्यानंतर उघडलेल्या लाॅकडाऊन नंतर आपण रस्त्यावर, बाजारात, पानपट्ट्या, सलून, बझार, मित्रांनी आयोजित केलेले समारंभ इत्यादी मध्ये बेजबाबदारपणे वावर केल्यामुळे  झाला आहे. किमान इथून पुढे तरी नीट काळजीपूर्वक मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे सुरू करणे आता अपरिहार्य झाले आहे, असे मत सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध नेत्रविकारतज्ञ आणि रोटरी क्लब ऑफ सांगली सिटीचे माजी अध्यक्ष डाॅ. सुहास जोशी यांनी व्यक्त केले आहे.
           डाॅ. सुहास जोशी हे सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध नेत्रविकारतज्ञ आहेत. तसेच रोटरी क्लब ऑफ सांगलीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात. कोरोना विषयी जागृती करताना डाॅ जोशी म्हणाले,  ताप, सर्दी, तोंडाची चव बदलणे, अंगदुखी, वास न येणे, अशक्तपणा, थकवा, कोरडा खोकला इ. लक्षणं अंगावर न काढता, लक्षणे सुरू झाल्यापासून चौथ्या किंवा पाचव्या दिवशी स्वॅब तपासणी करून घ्यावा.स्वॅब पाॅझिटीव्ह आल्यावर  आपल्या डाॅक्टरांचे मार्गदर्शन घ्या. त्यानंतर दोन दिवसांनी छातीचा सीटी स्कॅन करून घ्या. सोबत रक्ताच्या तपासण्या करून घ्या. होम आयसोलेशनमधे स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवा, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरणे चालू ठेवा . टाॅयलेट आणि बाथरूम पाॅझिटीव्ह पेशंटने वापरल्यानंतर एक टक्के  सोडियम हायपोक्लोराइटने स्वच्छ करून घ्या. स्वतःचे ताट, कपबशी, कपडे साबणाने स्वच्छ करून ठेवा.
           तसेच घरी पल्सऑक्सीमिटरवर ऑक्सीजन व नाडीचे ठोके मोजा व आपल्या डाॅक्टरांना सांगा. सहा मिनिटे सलग हळूहळू चालून पुन्हा ऑक्सीजन कमी होतो का, दम/धाप लागते का? ते पहा व आपल्या डाॅक्टरांचे मार्गदर्शन घ्या. गरज पडल्यास डाॅक्टर अॅडमिट करण्याचा सल्ला देतील तर हाॅस्पिटलच्या फोन नंबर ची लिस्ट तयार ठेवा आणि कोठे बेड मिळेल याची अगोदर माहिती मिळवा व एडमिशनची तयारी ठेवा.
     चौथ्या  किंवा पाचव्या दिवशी स्वॅब टेस्ट घ्या...
    आजार आपल्यासुद्धा होऊ शकतो हे स्वीकार करा. लवकर तपासणी, लगेच आयसोलेशन, लवकर उपचार व गरज वाटल्यास एडमिशन व ऑक्सीजन यामुळे आपण मृत्यू टाळून समाजात पसरणारी साथ आटोक्यात आणा शकतो. उशीरा तपासणी केली तर पेशंट जास्त सिरीयस होण्याची शक्यता जास्त असते. त्रास सुरू झाला की पहिल्या तीन चार दिवसात स्वॅब निगेटीव्ह येवू शकतो. म्हणून चौथ्या  किंवा पाचव्या दिवशी स्वॅब तपासणी करून घ्या. घाबरून तपासणी टाळून स्वतःला  धोक्यात ढकलू नका.
         काळजी घ्या. मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे व सॅनिटायझर वापरणे चालूच ठेवा यामध्ये खंड पडू देवू नका, असा सल्ला डाॅ. सुहास जोशी यांनी दिला आहे.
लेखन
डाॅ. सुहास जोशी
नेत्रविकारतज्ञ, सांगली


 

Post a Comment

0 Comments