Daily Mahasatta

Daily Mahasatta

शेतमजुराचा निर्धार...पोरीला कलेक्टर करणार


हिंगणगादे : सरपंच  सुबराव निकम, उपसरपंच सुरेश पवार, अजित मोहिते, अमृत ईनामदार, देवा मोहिते, राजू मुलांनी, तानाजी सुतार, दिपक मदने यांनी कु. प्रिती मदने हिचा सत्कार केला. यावेळी शंकर मदने, सौ. मीरा मदने उपस्थित होते.

: हिंगणगादेच्या कु. प्रिती मदने हिने दहावीत पटकावले 93.20 टक्के गुण

सांगली (राजेंद्र काळे)
      " नवरा-बायको, दोघांनी कामाला गेलं तर दररोजची चुल पेटणार. पोरांची हौस मौज झाली नाही. पण फाटक्या प्रपंचातन देखील मुलांना शाळेत काही कमी पडू दिलं नाही. आता पोरीने दहावीच्या परिक्षेत ९३ टक्के मार्क मिळवत आमच्या कष्टाचे चीज केलंय. तिला पुढे शिकून कलेक्टर व्हायचं आहे. आमची अजून कष्ट करायची तयारी आहे. गरज पडली तर थोडी शेती आहे, ती पण विकायची तयारी आहे. पण पोरीला काहीच कमी पडू देणार नाही, असा निर्धार हिंगणगादे ता. खानापूर येथील शंकर गणपती मदने या शेतमजुरांने व्यक्त केला आहे.
           हिंगणगादे येथील मदने मळ्यात शंकर  मदने आणि मिरा मदने हे दांपत्य  वास्तव्यास आहे. त्यांना दोन मुले आहेत. यामध्ये मोठी मुलगी प्रीती मदने हिणे इयत्ता दहावीच्या परीक्षेत नुकतेच 93.20 टक्के गुण मिळवले आहेत. तिच्या या यशानंतर हिंगणगादेचे  सरपंच सुबराव निकम, उपसरपंच सुरेश पवार, माजी उपसरपंच अजित मोहिते, दिपक मदने यांनी कु. प्रिती मदने  हिचा हिंगणगादे ग्रामस्थांच्यावतीने घरी जावून सत्कार केला.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन मुलींने मिळवलेले आभाळाएवढ यश आणि ग्रामस्थांनी घरी येऊन मुलीचे केलेले कौतुक पाहून मदने दाम्पत्याचे डोळे पाणावले.आमदार अनिलभाऊ बाबर यांनी देखील प्रितीचा सत्कार करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
        कुमारी प्रिती मदने हिचे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. प्रिती ही दहावीला विटा हायस्कूल या शाळेत शिकत होती. त्यामुळे हिंगणगादे ते विटा दररोजचा प्रवास करावा लागत होता. परिस्थिती बेताची असली तरी आईवडिलांनी कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. त्यांचे पाठबळ आणि विटा हायस्कूल या शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. आपल्याला खूप शिकून कलेक्टर व्हायचं आहे, अशी इच्छा कुमारी प्रिती मदने हिने महासत्ता सांगली न्यूज पोर्टलशी बोलताना व्यक्त केली.
          एकाबाजूला मुलगी नको म्हणून तिची गर्भातच हत्या करणारे हजारो उच्चशिक्षित लोक समाजात आहेत. तर दुसरीकडे  स्वतः अल्पशिक्षीत असताना मुलीच्या शिक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारी ही हिंगणगादे येथील शेतमजुर दाम्पत्याची जोडी समाजाला नवीन दिशा दाखवेल हे निश्चित.
......................................................

चौकट
      पोरीला कलेक्टर करणार...
      दहावीला चांगले गुण मिळवून पोरींने आमच्या कष्टाचे चीज केलय. आता तिला आणखी  पुढं शिकून कलेक्टर व्हायचंय. इथून पुढे देखील तिला पैशाची कमी पडू देणार  नाही.  यासाठी आम्ही रात्रंदिवस कष्ट करू. लागलेच तर आहे ती अर्धा एकर जमीन देखील विकू. पण पोरीला कलेक्टर करणारच, असा निर्धार हिंगणगादे येथील शंकर मदने यांनी महासत्ता सांगली न्यूज पोर्टलच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.

 

Post a Comment

0 Comments