Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाहन गेले अन् गटार ' अंडरग्राउंड ' झालं ...


विटा : भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या पाठीमागील रस्त्यावरील अंडरग्राउंड गटारीच्या निकृष्ठ कामाची पहाणी करताना शिवसेनेचे नगरसेवक अमर शितोळे.

: पालिकेच्या ठेकेदाराचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर
: प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी


विटा, प्रतिनिधी
         चारचाकी वाहन गेले, अन चक्क गटारचं ' अंडरग्राउंड ' झालं, असा भलताच प्रकार भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजू ते भवानीमाळ पाटील वस्ती रस्ता याठिकाणी झाल्याचे उघडकीस आले आहे . सुमारे 20 ते 25 लाख रुपये खर्च करून बांधलेल्या या अंडरग्राउंड गटारीच्या कामाचा सहा महिन्यातच पर्दाफाश झाल्याने पालिकेच्या या ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा नमुना चव्हाट्यावर आला आहे.
           मायणी रस्त्यावरील भैरवनाथ मंगल कार्यालयाची पाठीमागील बाजू ते भवानी माळ रस्ता या मुख्य रस्त्यावर सुमारे पंधरा वर्षांहून अधिक काळ गटर बांधण्याची मागणी होती. मात्र गेली पंधरा वर्षे या ठिकाणी पालिकेने गटर बांधलेले नव्हते.सुमारे वर्षभरापूर्वी या रस्त्यालगत मोठा खड्डा काढून गटारीचे पाणी सोडण्यात आले होते. या खड्डयातील पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका असून याठिकाणी तातडीने गटारी चे बांधकाम व्हावे, यासाठी दैनिक महासत्ता मधून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
          काही महिन्यांपूर्वी याठिकाणी सुमारे २० ते २५ लाख रुपये खर्च करुन अंडरग्राउंड गटार बांधण्यात आले आहे. मात्र आता या गटारीच्या निकृष्ठ कामाचा नमुना समोर आला आहे. या कामात वापरलेल्या सिमेंट पाईप अत्यंत निकृष्ठ दर्जाच्या आहेत. काल या रस्त्याने जाणार्या एका वाहनाच्या बोझामुळे ही अंडरग्राउंड गटार शब्दशः ' अंडरग्राउंड ' म्हणजेच मातीखालीच गेली आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार करताच शिवसेनेचे नगरसेवक अमर शितोळे यांनी या ठिकाणी भेट देऊन पहाणी केली. या रस्त्याने वाहनांची वर्दळ असते.त्यामुळे याठिकाणी एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. सदर रस्त्यावरील पाईप बदलून तातडीने रस्ता सुरु करावा, रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

................................................
चौकट :
 या निकृष्ठ कामाची चौकशी करावी
: अवघ्या वर्षभरापूर्वी सुमारे 20 ते 25 लाख रुपये खर्च करुन बांधलेले हे अंडरग्राउंड गटार अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे.सदर कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहे.तसेच पालिका प्रशासनाने तातडीने या गटारीची दूरस्थी करून रस्ता वाहतुकीस खुला करावा.
अमर शितोळे
नगरसेवक, विटा नगरपरिषद 

Post a Comment

0 Comments