Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात कोरोना हरला, माणुसकी जिंकली

विटा : पीपीई कीट घालून कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारे विटा नगर  पालिकेचे कोव्हीड योद्धे छायाचित्रात दिसत आहेत.

: विटा नगरपरिषदेने जपलं माणुसकीचे नातं
: मयत कोरोनाग्रस्तांवर पालिकेकडून अंत्यसंस्कार

विटा ( नितीन चंदनशिवे)
      आज कोरोना च्या भीषण संकटामुळे रक्ताची नाती दुरावली जात आहेत. कोरोना झाल्याचे समजताच सर्व नातेसंबंध गळून पडत आहेत.एकाद्याला दवाखान्यात बघायला नव्हे तर मयताला देखील रक्ताने जोडलेली माणसं जात नाहीत. अशावेळी कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करत विटा नगरपालिकेचे कोव्हीड योद्धे आपल्या जिगरबाज कामाचा परिचय देत आहेत.
            कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर संबंधित रुग्णांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात न देता त्याचे शासनाच्यावतीने अंत्यसंस्कार करावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे अंतिम संस्कार करण्याचे काम पालिकेवर आले आहे. विटा पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनीदेखील याकामी व्यक्तिगत लक्ष घालून कोरोनाग्रस्त मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी पालिकेच्या आठ ते दहा कर्मचाऱ्यांची टीम नियुक्त केली आहे. एक ऑगस्ट रोजी वेजेगाव येथील एका कोरोनाग्रस्त मयत व्यक्तीवर  अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर आज धोंडगेवाडी येथील 55 वर्षीय मयत व्यक्तीवर  विट्यातील  येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
           कोरोनामुळे कुटुंबापासून दूर  झालेल्या या मृतदेहाचे  अंतीम संस्कार करण्याची जबाबदारी आता शासकीय अधिकार्यांना पार पाडावी लागत आहे. तहसिलदार ऋषिकेत शेळके, मुख्याधिकारी अतुल पाटील, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे,  डॉ. अविनाश लोखंडे, डॉ. अभिजित निकम, आरोग्य सेवक सोळसे, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, मुकादम राजू  पाटील, सुपरवायझर सुरेश साळूंखे, नदीम मुल्ला, सलीम शेख व अन्य नगरपरिषद कर्मचारी, तहसिल कार्यालय कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांनी नैतिक कर्तव्याला प्राधान्य देत  जीवाची पर्वा न करता ही सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत.
     पालिकेने विटा शहरात कोरोनाबाबत करत असलेल्या कामात ह्या कामाचा खरा उल्लेख करणे  आवश्यक  आहे. सुन्न व भयावहक स्थितीत माणसाच मरण ही किती भेदरलेले आहे याची प्रचिती यावेळी आल्याशिवाय राहत नाही. शासनाच्या कर्तव्यापलिकडे जावून पालिकेच्या  समाजपयोगी  सेवेला आणि कार्याला निश्चित सलाम करावा लागेल. विटा नगरपरिषदेचे  कोरोना योध्यांचे जिगरबाज कार्य हे सर्वांना अभिमानास्पद आहे. या कोरोना योद्धांचे काम बघून विट्यात कोरोना हरला, माणुसकी जिंकली असेच म्हणावे लागेल.
.........................................................

चौकट :
  अंत्यसंस्कारसाठी टीम सज्ज
: कोरोना मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विटा पालिकेने आठ जणांची विशेष टीम तयार केली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांना पीपीई कीट पुरविण्यात येत असून त्यांच्या सुरक्षिततेची पूर्णतः काळजी घेण्यात आली आहे. शासनाच्या कर्तव्या बरोबरच सामाजिक जाणिवेतून हे  सर्व कर्मचारी काम करत आहेत, याचा आम्हाला विशेष अभिमान आहे.
            अतुल पाटील, मुख्याधिकारी
             विटा नगरपरिषद, विटा


 

Post a Comment

0 Comments