Daily Mahasatta

Daily Mahasatta

सदाभाऊ खोत यांच्या चालकाला फिल्मी स्टाईलने भर चौकात भोसकण्याचा प्रयत्न

      शकील गोलंदाज ( संशयित आरोपी )

: गुंड शकील गोलंदाजला अटक : एक जण फरार

इस्लामपूर, (हैबतराव पाटील )
         माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांच्या खासगी गाडीवर असणाऱ्या अनिल पवार या चालकला गाडी अडवून भर चौकात जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या प्रकरणात इस्लामपूर येथील गुंड शकील गोलंदाज व त्याचा साथीदार सुहेल मुल्ला या दोघांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या विरोधात अनिल पवार यांनी फिर्याद दिली आहे.
            अनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांचे खाजगी वाहन क्र. एम. एच 10 डी एल 1015 या वाहनावर मी चालक आहे . शनिवारी दुपारी 3.15 वाजता मी व सोबत स्वप्नील सुर्यवंशी असे आम्ही दोघे (वाहन क्र. एम. एच 10 डी एल 1015) या वाहनात पेट्रोल भरण्यासाठी वाघवाडी रोडला असलेल्या प्रतिक पेट्रोल पंपावर जायला वाघवाडी रोडला वळलो असता समोरून एक चार चाकी (वाहन क्र. एम एच 43 ए ई 0007) या वाहनावरील चालकाने क्रॉस मारून आम्हाला आडवले. 
         या वाहनात येथील गुंड शकील गोलंदाज व त्याच्यासोबत त्याचा साथीदार सुहेल मुल्ला हे होते. ते दोघे माझे वाहनाजवळ आले व शकील गोलंदाज याने 'तु माझ्या गाडीच्या आडवी गाडी मारतोस काय? रे असे म्हणत त्याने शिवीगाळ केली. त्यावेळी मी खाली आलो असता गोलंदाज याचा साथीदार सुहेल मुल्ला अरे बघतोस काय, मार त्याला' असे ओरडला . त्यावेळी गोलंदाज मला म्हणाला, तुला आता ठेवतच नाही संपवतोच' असे म्हणून त्याचेकडील चाकू काढून माझ्या पोटात मारत असताना मी तो वार चुकवला. गोलंदाजला धक्का मारून बाजूला ढकलून गाडीत बसलो. त्या क्षणी त्याने जमलेल्या लोकांना ही त्याच्याजवळील चाकू हातात घेवून लोकांकडे बघत 'कोणी पुढे आले तर, जिवंत सोडणार नाही' अशी धमकी देत होता. त्यावेळी मी गाडी रिव्हर्स घेवून तेथून वाघवाडी रोडने निघून गेलो.
          याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार गोलंदाज व त्याचा साथीदार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गोलंदाजला पोलिसांनी अटक केली आहे. गोलंदाजला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचा साथीदार सोहेल मुल्ला हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे .शकील गोलंदाज हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात जवळजवळ 10 जबरी गुन्ह्यांची नोंद आहे .

Post a Comment

0 Comments