Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाढीव वीज बिल माफ करा, अन्यथा आंदोलन : भाजपचा इशारा


कडेपूर : सहायक अभियंता अजय काशिद यांना निवेदन देताना राजेंद्र मोहिते, कृष्णत मोकळे, विशाल मोहिते, वांगी भाजपा अध्यक्ष श्रीनिवास जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम पाटणकर, शंकरराव वावरे.

कडेगाव ( सचिन मोहिते)
         वीज वितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना वाढीव बिलाचा शॉक दिला आहे. तसेच वीज युनिटचे दरवाढ करून ग्राहकांची लुट चालवली आहे. ग्राहकांना दिलेले वाढीव रक्कमेची वीज बिले माफ करण्यात यावीत. अशी मागणी वांगी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
         वीज विरतण कंपनीचे कडेपूर (ता.कडेगाव) येथील सहायक अभियंता अजय काशिद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेले चार महिने लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये सर्व उद्योग-धंदे बंद होते. अशा संकटाच्या कालावधीत केंद्र सरकारने लोकांना स्वस्त धान्य दुकानामार्फत मोफत धान्य वितरण करून दिलासा देण्याचे काम केले आहे. तशाच पध्दतीने राज्य सरकारने लोकांना मदत करणे गरजेचे आहे.असे असताना महावितरण कंपनीने घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना लॉकडाऊन कालावधीत चुकीची व जादा रक्कमेची बिले दिली आहेत. तसेच वीज युनिटचे दर वाढ करून ग्राहकांना शॉक दिला आहे.
        लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांना दिलेली चुकीची व जादा रक्कमेची बिले माफ करावीत. तसेच वीज युनिटची केलेली दरवाढ रद्द करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावरती भाजपा नेते राजेंद्र मोहिते, कृष्णत मोकळे, विशाल मोहिते, वांगी भाजपा अध्यक्ष श्रीनिवास जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम पाटणकर, शंकरराव वावरे यांच्यासह कार्यकर्ते व वीज ग्राहकांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments