Daily Mahasatta

Daily Mahasatta

ढवळेश्वरात... युवा नेत्याकडून लाॅकडाऊनला कोलदांडा


ढवळेश्वर : येथील मुख्य रस्त्यावर मास्क न घालता, सोशल डीस्टनसिंगचे उल्लंघन करत वाढदिवस साजरा करताना माजी उपसरपंच दिलीपअण्णा किर्दत व अन्य.

: प्रशासन काय कारवाई करणार? याकडे तालुक्याचे लक्ष

विटा, प्रतिनिधी
         विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना ढवळेश्वर येथील युवा नेते दिलीप अण्णा  किर्दत यांनी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या नियमांना कोलदांडा घालून भररस्त्यात बेकायदेशीर जमाव जमवून  मित्रांच्या वाढदिवसाचा धमाका उडवून दिला आहे. स्वतः दिलीपअण्णा यांनी  हे वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे नागरिकातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
           सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना  चा प्रसार झपाट्याने होत आहे आज बुधवार तारीख 5 रोजी एका दिवशी खानापूर  तालुक्यात 15 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 70 हून अधिक झाला आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे काही उत्साही राजकीय नेते मंडळींना कोणतेही सोयरसुतक नसल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात सध्या जमावबंदी, सोशल डिस्टंसिंगचे पालन, मास्कचा वापर सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा न करणेबाबत शासनाचे आदेश आहेत. परंतु खानापूर तालुक्यातील काही नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते शासनाच्या नियमांना हरताळ फासून सार्वजनिक ठिकाणी  जाहीरपणे कार्यक्रम साजरे करत आहेत.
        शहरात  फिरताना मास्क नसेल,  दुचाकीवर डबल बसले किंवा दुकानात माल खरेदी करताना सोशल डिस्टंसिंग ठेवले नाही तर प्रशासनाच्यावतीने गुन्हे दाखल होतात. मात्र  ढवळेश्वर येथील वाढदिवस साजरा करताना माजी उपसरपंच युवा नेते दिलीप अण्णा  किर्दत तसेच विद्यमान उपसरपंच यांनी 14-15 जणांचा बेकायदेशीर जमाव जमवून भर रस्त्यात मित्रांचा वाढदिवस साजरा केला आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रशासनाने आता थोडी हिंमत दाखवून संबंधितावर शासकीय नियमानुसार योग्य ती कारवाई  करावी. ज्यामुळे अशा बेकायदेशीर कृत्यांना आणि पर्यायाने कोरोनाच्या प्रसाराला आळा बसेल.


Post a Comment

0 Comments