Daily Mahasatta

Daily Mahasatta

कसबे डिग्रज मध्ये 2 सप्टेंबर पासून जनता कर्फ्यू

कसबे डिग्रज : येथील बैठकीत बोलताना मंडल अधिकारी विजय तोडकर. यावेळी सरपंच किरण लोंढे, उपसरपंच आरिफ खाटीक, जेष्ठ नेते तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदराव नलवडे उपस्थित होते.

मिरज ( किरण पाटील)
         कसबे डिग्रज मधील कोरोना महामारीचा वाढता प्रभाव व वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दिनांक 2 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू असणार आहे, अशी मााहिती प्रशासनाने दिली आहे. 
         याबाबत अधिक माहिती अशी,गावात सध्या 36 हुन अधिक रुग्ण संख्या आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढतच आहे. संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असताना सुद्धा गावातील नागरिकांकडून आवश्यक काळजी घेतली जात नाही. मास्कचा वापर करत नाहीत, ठिकठिकाणी कट्टयावर गप्पा मारत बसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. गावातील वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी गावातील प्रमुख नेते मंडळी, दुकानदार, व्यापारी, पानपट्टी चालक, मजूर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्वांची मते जाणून घेऊन गावात जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
        तसेच जनता कर्फ्यु काळातील चालू सेवांसाठी नियमावली तयार करण्यात आली, जनता कर्फ्यु काळात फक्त दवाखाने आणि औषध दुकाने अविरत सुरू असतील तसेच गावातील दूध संकलन केंद्र सकाळी दोन तास आणि सायंकाळी एक तास सुरू राहतील. जनावरांच्या चाऱ्यासाठी एक आड एक दिवस सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत वैरण आणण्यास परवानगी दिली आहे. 8 दिवसांसाठी लागणारे धान्य आणि इतर आवश्यक वस्तू घेऊन ठेवाव्यात असे आवाहन करण्यात आले. गावातील बँक , पतसंस्था, सोसायटी, कंपन्या पूर्णपणे बंद राहतील. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणांसाठी नागरिकांनी बाहेर पडायचे नाही, शासकीय नियमांचे पालन करायचे असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी जेष्ठ नेते तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदराव नलवडे, मंडल अधिकारी विजय तोडकर, ग्राम विकास अधिकारी एमआर सरगर, तलाठी के एल रुपनर, सरपंच किरण लोंढे, उपसरपंच आरिफ खाटीक, ग्रामपंचायत सदस्य सागर भैय्या चव्हाण, गजानन गावडे, संजय आबा शिंदे, रवींद्र परीट यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments