राज्यातील सर्वच डाॅक्टरांना ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे: निमा संघटनेचे अध्यक्ष डाॅ. दत्ताजीराव हुलगे यांची मागणी
        
सांगली, प्रतिनिधी
        शासकीय सेवेत असलेले डॉक्टर तसेच शासनाने अधिग्रहीत केलेल्या हॉस्पिटल मधील डॉक्टर यांना शासनाच्या निर्देशानुसार 50 लाखांचे विमा संरक्षण मिळणार आहे . त्याचे आम्ही स्वागत करतो.  मात्र आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या संकटात रुग्णसेवा करणाऱ्या राज्यातील सर्वच खासगी डॉक्टरांना देखील पन्नास लाखांचे विमा संरक्षण शासनाने द्यावे, अशी  अशी मागणी  माहिती नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे (निमा) विटा शहर अध्यक्ष डॉक्टर दत्ताजीराव बाबुराव हुलगे यांनी केली आहे.
         अध्यक्ष डाॅ. हुलगे म्हणाले, गेल्या चार महिन्यापासून जगभरात कोरोनाच्या साथीने थैमान घातले आहे. कोरोनाच्या विरोधातील या लढाईत आघाडीवर असणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे डॉक्टर . आज पर्यंत शासकीय सेवेत असणारे तसेच खासगी व्यवसाय करणारे सर्व वैद्य मंडळी एकदिलाने अव्याहतपणे आपली सेवा समाजास देत आहेत.
       स्वतःच्या जीवास असणारा धोका माहीत असून सुद्धा खासगी डॉक्टर सरकारी डॉक्टरांच्या बरोबरीने सर्व रुग्णांची सुश्रुषा करत आहेत.  शासनाने फक्त शासकीय डॉक्टर व अधिग्रहित केलेल्या रुग्णालयाच्या ठिकाणाचे डॉक्टर यांचे साठी  50 लाख रुपयाचे विमा संरक्षणाची घोषणा केली आहे. हक्काने वैद्यकीय सेवा चालू ठेवण्याचे आदेश दिले जात असतील व त्याच वेळेला त्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेचा विचार शासनाकडून होत नसेल तर ही खेदाची बाब आहे. ही गोष्ट खासगी डॉक्टरांचे मनोबल वृद्धिंगत करणारी निश्चितच नाही.
                 कोणताही रुग्ण हा अगोदर त्याचे जवळचे खासगी डॉक्टरकडे म्हणजेच जनरल प्रॅक्टिशनरकडे जातो. नंतर तो जर कोरोना संशयित असेल तरच सरकारी रुग्णालयाकडे पाठविला जातो. अशावेळी कळत-नकळत  खासगी वैद्यकीय व्यवसायिकाची कोरोना बाधित रुग्णांशी संबंध येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत त्याला अपघाताने धोका संभवू शकतो. आजपर्यंत महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी अशा पद्धतीने खासगी वैद्यकीय व्यवसायिक यांचा कोरोनाने मृत्यू ओढवला आहे. तुलनात्मक विचार केला तर शासकीय डॉक्टर पेक्षा खासगी छोटे दवाखाने असणारे जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांची या मृतयादीत संख्या जास्त आहे.
       रुग्णसेवा करुनही जर खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना शासकीय योजनेचा फायदा मिळत नसेल तर तो त्यांच्या वरती एक प्रकारचा अन्यायच आहे. याची दखल घेऊन शासनाने काहीच लोकांना 50 लाखाचे विमा संरक्षण देण्यापेक्षा सर्वच डाॅकटरांना विमा संरक्षण  देऊन सद्यस्थितीत कोरोनाच्या या लढाईत ज्यांचा प्रामुख्याने सहभाग आहे, अशा छोट्या वैद्यकीय व्यवसायिक डॉक्टरांना म्हणजेच जनरल प्रॅक्टिशनरना दिलासा द्यावा. याप्रकरणी लवकरच संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहे, अशी माहिती डॉ. दत्ताजीराव बाबुराव हुलगे.(अध्यक्ष, निमा वैद्यकीय व्यवसायिक  संघटना. शाखा - विटा) यांनी दिली आहे.

डाॅ. दत्ताजीराव हुलगे
विटा (जि.सांगली)
मोबा. 9975109016

Post a comment

0 Comments