विटा, प्रतिनिधी
विटा शहरात कोरोनाचा शिरकाव सुरूच असून आज दुपारी दोन महिलांचे कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या दोन्ही महिला कुंडल रोडवरील भवानीनगर येथील रुग्णाच्या संपर्कातआल्या होत्या, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ अनिल लोखंडे यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील सर्वात सुरक्षित तालुका म्हणून ओळखला जाणार्या खानापूर तालुक्यात आता कोरोनाने जोरदार एन्ट्री मारली आहे. तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ४१ वर पोहोचला आहे. आज बुधवार दुपारपर्यंत विटा शहरातील भवानीनगर येथील दोन महिलांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत. यामध्ये १७ वर्षाची मुलगी आणि २६ वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. तसेच तालुक्यातील मादळमुठी येथे आणखी तिघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये ११ वर्षाचा मुलगा, ९ वर्षाची मुलगी आणि ३२ वर्षाची महिला यांचा समावेश आहे.आज पॉझिटिव्ह आलेले पाचही रुग्ण विट्यातील कोव्हीड सेंटर मध्ये यापूर्वीच दाखल आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी दिली आहे. तसेच घुमटमाळ येथील कोरोना ग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे २१ जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे, त्यामुळे नागरिकांनी घरीच राहून व सर्व प्रकारची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी केले आहे
0 Comments