
तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना निवेदन
देताना श्रीकृष्ण निकम व सहकारी
विटा, प्रतिनिधी
कोरोनाच्या लढाईत तो एखाद्या लढवय्या योद्धा सारखा दिवस-रात्र लढला. गावात कंटेनमेंट झोन उभारणीपासून ते गावातील सर्वे करणे, शासकीय नोंदी ठेवणे, निर्जंतुणीकरण, होम क्वारंटाईन लोकांवर लक्ष ठेवणे, शासनाला अहवाल सादर करणे यासह सर्वच काम तलाठी म्हणून पूर्ण करत होता. मात्र गावाचे रक्षण करता करता हा कोव्हीड योद्धा हृदयविकाराने स्वतःच प्राणाला मुकला. आता शासन या कोव्हीड योद्धाच्या कामाची दखल घेऊन त्याच्या कुटुंबाला आधार देणार की त्यांना वाऱ्यावर सोडणार? हा खरा सवाल आहे.
खानापूर तालुक्यातील संजय विष्णू पाटोळे हे मौजे साळशिंगे येथे तलाठी या पदावर काम करत होते. 10 मे 2020 रोजी साळशिंगे येथे तालुक्यातील पहिला कोरनाग्रस्त रुग्ण आढळून आला. या दिवसापासून तलाठी पाटोळे कंटेनमेंट झोन करण्याचे काम करत होते. त्यानंतर सदर गावात दर 20 दिवसांनी एक रुग्ण असे आतापर्यंत सहा रुग्ण त्या गावात सापडले. 24 जुलै रोजी तलाठी पाटोळे यांचे निधन झाले ,त्या दिवशी सुद्धा कोरोनाचा पेशंट गावात आढळून आला आहे. त्यामुळे तलाठी पाटोळे यांना 10 मे ते 24 जुलै या संपूर्ण कालावधीत अहोरात्र काम करावे लागले आहे. त्यांना कामाचा मोठ्या प्रमाणात ताण आल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना औषध उपचार घेण्यासाठी दवाखान्यामध्ये जाण्यास सुद्धा वेळ मिळाला नाही. वैद्यकीय सुविधा मिळाली नसल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे 24 जुलै रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांवर अत्यंत वाईट वेळ आली आहे.
राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला ही म्हण राजकारणासाठी नेहमीच वापरले जाते. अर्थात शासनाकडून मोठ्या घोषणा होतात. त्याची अंमलबजावणी करताना मात्र शेकडो पळवाटा काढल्या जातात. कोरोनाच्या या लढाईत काम करणाऱ्या डॉक्टर, पोलीस, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी या सर्वांना शासनाने कोव्हीड योद्धा म्हणून घोषित केले आहे. या योद्ध्यांचा मृत्यू जर कोरोनामुळे झाला तर त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांचा विमा संरक्षण शासनाने जाहीर केला आहे.
शासनाने या संकटात लढणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कोव्हीड योद्धा असे संबोधून सन्मान दिला आहे. त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पन्नास लाखांची मदत दिली जाणार आहे, असे जाहीर केले आहे. तलाठी पाटोळे यांचा मृत्यू कोरनामुळे झाला नसला तरी कोरोना काळात केलेल्या अतिकामाच्या ताणामुळे झाला आहे? हे कोणीच नाकारू शकणार नाही. त्यामुळे केवळ तलाठी संजय पाटोळे नव्हे तर कोरोनाच्या संकटात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कामाच्या ताणामुळे मृत्यू झाल्यास त्यांनादेखील शासनाने पन्नास लाखांची मदत करणे आवश्यक आहे. शासन आता या कोव्हिड योद्धाला काय मदत करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
.....................................
कोव्हीड योद्धाचा सन्मान करावा
तलाठी संजय पाटोळे यांचा मृत्यू कोरोना काळातील कामाच्या अतिताणामुळे झाला आहे.त्यांनी पूर्ण इमानदारीने साळशिंगे गावात काम केले आहे. शासनाने या कोरोना योद्धाचा सन्मान करून त्यांच्या कुटुंबाला पन्नास लाखांची मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ खानापूर तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण निकम आणि सहकार्याने केली आहे. यावेळी मंडलाधिकारी सतीश साळुंखे, विनायक पाटील, विजय ओमाशे , एफ.एम. मुल्ला, धनश्री कदम, जोती कोतवाल, मनीषा सूर्यवंशी, श्रीकांत कैकाडी, सत्यवान सुर्वे, संगीता बी. पाटील, आणि कोतवाल संघाचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव उपस्थित होते.
0 Comments