Daily Mahasatta

Daily Mahasatta

सॅल्युट...विटा पालिकेच्या कोरोना योद्धांनासांगली ( राजेंद्र काळे )
       काल शुक्रवार ३१ रोजी विटा नगरपालिकेच्या दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांसह तिघा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण  झाल्याचे स्पष्ट झाले आणि शहरात एकच खळबळ उडाली.  पालिका प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत तीन दिवसासाठी पालिका सील करण्याचा निर्णय घेतला. पालिकेतील कर्मचाऱ्यांचे काम थांबले मात्र स्वच्छता कर्मचारी म्हणून शहरातील कचरा गोळा करणाऱ्या कर्मचार्यांनी भल्या पहाटेच कोरोनाची भिती झुगारून देत पुन्हा  आपल्या कामाला सुरुवात केली, आणि आपसूकच नागरिकांनी या धाडसी कामगिरीला सॅल्यूट केला.
        पुणे, मुंबई , कोल्हापूर , सातारा या जिल्ह्यांनंतर आता कोरोनाचे संकट ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे.  विटायात देखील आता नियमितपणे चार ते पाच रुग्ण सापडत असल्याने भीतीचे वातावरण आहे. जो तो आपल्याला कोरोना पासून सुरक्षित कसे ठेवता येईल हे पाहत आहे. मात्र नगरपालिकेचे कोरोना  योद्धा कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून स्वच्छतेचा वसा प्रामाणिकपणे जोपासताना दिसत आहेत भल्या पहाटे उठायचं आणि शहरातील घरोघरी पोहोचून नागरिकांच्या घरात जमा होणारा कचरा घंटागाडीच्या सहाय्याने गोळा करायचा आणि तो कचरा डेपो पर्यंत पोहचवायचा हा नित्यक्रम. या क्रमात कधीच खंड होत नाही. अगदी दिवाळी-दसरा किंवा अन्य सण देखील हे कर्मचारी आपले नेहमीचे काम करूनच मग साजरे करतात.
       काल शुक्रवारी तीन पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आज सर्व कर्मचाऱ्यांचे काम थांबणार. घंटागाड्या आता येणार की नाही? कचरा गोळा केला जाणार की नाही? असे सवाल लोकांच्या मनात उपस्थित होते. मात्र या कोरोनाची भीती झुगारून देत स्वच्छता कर्मचाऱ्यांची टीम पहाटेपासूनच पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला लागली आणि बघता बघता शहरातील सर्व कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचून आज नेहमीप्रमाणे कचरा गोळा करण्याचे काम त्यांनी पूर्ण केले. या कामगिरीमुळे सोशल मीडियातून माजी उपनगराध्यक्ष किरण भाऊ तारळेकर, दहावीर शितोळे  यांच्यासह अनेक मान्यवरांनी सोशल मीडिया पोस्ट टाकून या त्यांच्या कामाला सॅल्यूट केला या त्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.
 
चौकट :
       शहरातील आरोग्याला प्राधान्य
कोरोनाणाच्या या संकटात साथीचे किंवा अन्य कोणतेही आजार पसरू नयेत  ही आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे काल पालिकेतील तीन कर्मचारी बाधित सापडल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे काम न थांबवण्याचा निर्णय घेतला. निश्चितच हा निर्णय कौतुकास्पद आहे. आरोग्य विभागाचे काम अविश्रांत सुरु राहील, नागरिकांनी देखील सहकार्य करावे.
             आनंदराव सावंत
            आरोग्य निरिक्षक, विटा न.प.

चौकट :
         माजी आमदार अॅड सदाशिव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा शहर स्वच्छतेत देशात अव्वल आहे. काल दुर्दैवाने पालिकेचे तीन कर्मचारी कोरोना  बाधित आढळले. मात्र स्वच्छतेचा वसा घेतलेल्या कर्मचार्यांनी कोरोनाला न घाबरता आज भल्या पहाटे कचरा संकलनाचे काम केले. स्वच्छता कर्मचार्यांच्या या कामाचा समस्त विटेकरांना अभिमान आहे. या सर्व  पालिका कर्मचार्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत. नागरिकांनी देखील जास्तीतजास्त काळजी घ्यावी.
                 दहावीर शितोळे
                 माजी उपनगराध्यक्ष, विटा.


Post a Comment

0 Comments