Daily Mahasatta

Daily Mahasatta

रेवणसिध्द भाकणूकीबाबत मोठा निर्णय..

विटा, प्रतिनिधी
        श्री क्षेत्र रेवणसिद्ध येथील श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारी व शेकडो वर्षांची परंपरा असलेली भाकणूक  प्रथा यावर्षी रद्द करण्यात आली आहे.  मंदिर स्थापनेपासूनच्या इतिहासात प्रथमच हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासन, मंदिर पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.    
           श्रीक्षेत्र रेवणसिद्ध मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाकणूक करण्याची मंदिर स्थापनेपासूनची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यामध्ये पाऊस किती पडेल, पेरणी कशी होईल, शेतकर्यांना उत्पन्न किती मिळेल  असे भाकीत केले जाते. त्यामुळे भाकणूक प्रथेला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यावेळी जगभरात कोरोना विषाणूचे संकट आले आहे. त्यातच संपूर्ण सांगली जिल्हा लॉकलडाऊन करण्यात आला आहे. छोट्या, मोठया यात्रा जत्राना गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने सर्व देवस्थान व मंदिरांना  प्रतिबंधात्मक नोटिसाही दिल्या आहेत.
     श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी प्रथेप्रमाणे श्री रेवणसिद्ध मंदिरात भाकणूक होणार का नाही याबाबत भाविकात उत्सुकता होती. यासंदर्भात देवनगर, वासुंबे ,मूळस्थान, साळशिंगे व विटा येथील देवस्थानचे सर्व मानकरी, मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व भाविक यांची सोशल डिस्टंसिंग पाळून विटा तहसील कार्यालयात एक बैठक पार पडली. या बैठकीला प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे ,पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने कोरोना काळात घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन मंदिर पदाधिकारी, मानकरी व भाविकांच्या कडून केले जावे,  कोणताही उत्सव साजरा करताना  गर्दी होता कामा नये, कोरोनाचा प्रादुर्भाव उद्भवू नये यासाठी काही रूढी परंपरा यावरही निर्बंध घालणे आवश्यक आहे त्यासाठी काही सूचना प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्या .त्यानुसार एकमुखी भाकणूकीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
       या परंपरेला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. मंदिर स्थापनेपासून पहिल्यांदाच भाकणूक रद्द करण्याची घटना घडली आहे.  रेवणसिद्ध मंदिरात होणाऱ्या या भाकणूकिवर  परिसरातील भाविकांची  व शेतकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे. जे भाकणूक करतात त्यांच्या अंगात देवाचा संचार होतो म्हणून त्यांना ' देव' अथवा 'भाकणूक अय्या ' असे श्रद्धेने संबोधतात.आगामी पाऊसमान ,  पीकपाणी, पेरा, पिकाची धरण याबाबत ते भाकीत करतात. हे भाकीत अचूक अचुक असते किंबहुना शेतकऱ्यासाठी मार्गदर्शक असते अशी या परिसरातील लोकांची भावना आहे.

कोरोनामुळे इतिहासात प्रथमच भाकणूक रद्द     
सूचनांचा आदर करू ; बालाजी गुरव
    रेवणसिध्द मंदिरातील प्रतिवर्षी पहिल्या श्रावणी सोमवारी भाकणूक वर्तवली जाते. मंदिर स्थापने पासुन ही परंपरा सुरू आहे. परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाच्या सूचनेनुसार ही परंपरा खंडित करण्यात आली आहे. भाविकांच्या भावनेचा आम्ही जरूर आदर करू परंतु कोरोनाचे संकट असल्याने आपणाला काही निर्णय घेणे अपरिहार्य बनले आहे त्यामुळे शासनाच्या सुचनांचे सर्वांनीच पालन करूया असे आवाहन मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष बालाजी गुरव यांनी केले

Post a Comment

0 Comments