Daily Mahasatta

Daily Mahasatta

नव महाराष्ट्र आणि अकुज चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये ऑनलाईन शिक्षणकुपवाड ( प्रमोद अथणीकर)
     नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड या दोन्ही संस्था गेली कित्येक वर्षे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी- विद्यार्थीनींनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात संपूर्ण राज्य व देशपातळीवर  नाव उज्वल करित आहेत.
      या संस्थेत सध्या लालबहादूर बालमंदिर,  न्यू प्रायमरी स्कूल, सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय, अकुज प्री- प्रायमरी, अकुज प्रायमरी स्कुल, अकुज इंग्लिश मिडियम स्कूल, कॉलेज ऑफ आय टी प्रोफेशनल कोर्सेस  व स्वच्छंद संगीत महाविद्यालय आशा अनेक शाळा व विभाग कार्यरत आहेत.
       सध्याची कोरोनाची परिस्थिती ओळखून मार्च 2020 पासूनच विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अनेक शैक्षणिक, सामान्यज्ञान व कोरोना विषयीच्या जनजागृतीचे काम या संस्थेमार्फत सुरू केले व ते अद्याप आजअखेर सुरूच आहे.
     कोरोना व लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता या संस्थेच्या अगदी बालवाडीपासून ते बारावीपर्यंत मराठी माध्यम, सेमी माध्यम व इंग्रजी माध्यम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करून सर्व वर्गाचे व्हाट्सअप ग्रुप तयार केले. कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची योग्य ती दक्षता घेतली. तसेच संस्थेने स्वतःचे  युट्युब व फेसबुक चॅनेल सुरू करून याची माहिती पालकांपर्यत पोहोचवली. सर्व विद्यार्थी - विद्यार्थीनी आणि पालक यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना राबवली.
      यामध्ये लहानगट ते 2 री इयत्तेच्या विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण या संकल्पनेव्दारे कार्टून्स, शब्दखेळ, बडबडगीते, यांचे व्हिडीओज व ऑनलाईन पुस्तके इत्यादी व्दारे व्हाट्सअप ग्रुप  माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यत पोहचवून त्यांना शिक्षण देण्यात येत आहे. तसेच 3 री  ते 12 वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थिनींना स्वतः शिक्षकांनी तयार केलेले व्हिडीओज, युट्युब व्हिडीओ, ऑनलाईन पुस्तके या माध्यमातून शिक्षण देणेत येत आहे व त्याचे दररोज विविध ऍप्स व्दारे ऑनलाईन क्लासेस घेणेत येत आहेत.
     याचे दैनंदिन वेळापत्रक तयार केले आहे. दररोज ऑनलाईन वर्ग झालेनंतर शिक्षक विद्यार्थ्यांशी संपर्क करून त्यांना कितपत समजले याची चाचपणी करून घेतात व विद्यार्थ्यांना काही अडचणी शंका असतील तर त्याचे निरसन करतात. तसेच जे घटक शिकविले आहेत त्यांची उजळणी म्हणून आठवड्यातून 1 दिवस त्याची ऑनलाईन टेस्ट घेतात व विविध ऍप्स च्या माध्यमातून MCQ प्रश्नपत्रिका तयार करून ऑनलाईन सोडवून घेतात.
      ऑनलाईन वर्गासाठी किती विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित असतात व त्याच्या अभ्यासाच्या नोंदी दररोज शिक्षकांकडे ठेवण्यात येतात. या उपक्रमामध्ये शाळेतील जवळपास 85 ते 90 टक्के विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.तसेच काही वेळेला एकाच कुटुंबात दोन विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने काहीसे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर ह्या अडचणी दूर करण्यासाठी विविध वर्गाच्या ऑनलाईन वेळेत बदल करून घेतले जेणेकरून त्या पालकांचा दुसरा पाल्य शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली.
      नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संस्थांच्या शाळांनी मिळून कोरोनाची पार्श्वभूमी ओळखून लगेच ऑनलाईन प्रशिक्षणाला सर्वप्रथम सुरुवात केली व आजअखेर हे शैक्षणिक उपक्रम अविरत सुरू ठेवले आहेत.यामध्ये महत्वाची बाब म्हणजे संस्थेच्या सर्व विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी संगणक, मोबाईल, युट्युब इंटरनेट,  टेक्नॉलॉजीचे परिपूर्ण ज्ञान घेऊन ते आत्मसात करून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे शैक्षणिक नाविन्यपूर्ण व्हिडिओ तयार करून व्हाट्सअप वर युट्युब चॅनेल द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले.
     आजअखेर शिक्षकांनी जवळपास 500 च्यावर शैक्षणिक, अत्याधुनिक सायन्स लॅब प्रात्यक्षिके, संगणक व संगणक लँग्वेज लॅब प्रात्यक्षिके, योगा व क्रीडा प्रात्यक्षिके असे विविध विषयाचे नावीन्यपूर्ण व आकर्षक व्हिडिओज बनवून एक नवीन शैक्षणिक प्रवासास सुरुवात केली आहे. याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होत आहे व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळले आहे.

Post a Comment

0 Comments