Daily Mahasatta

Daily Mahasatta

पावसाळ्यात काय खावे ? काय टाळावे ?


          पावसाळा हा  आबालवृद्धांच्या आवडीचा ऋतू आहे. मात्र याच ऋतूमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण देखील सर्वाधिक असते. हा पावसाळा अनेक रोगांना आमंत्रण देणारा ठरतो. त्यामुळे पावसाळ्यात काय खावे आणि काय टाळावे?  हे सांगणारा पोट विकार तज्ञ डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा हा खास लेख आमच्या वाचकांसाठी देत आहोत ..
       आला पावसाळा, आरोग्य सांभाळा
पावसाळा हा विविध आजारांना  जसे की साथीचे आजार, पोटाचे आजार, ताप, वाताचे विकार, सर्दी, खोकला, दमा निमंत्रण देणारा ठरतो. पावसाळा सुरू झाला की दवाखान्यात  रुग्णांच्या रांगा लागतात. हे आपण पाहत असतो. पावसाळ्यामध्ये बाह्य सृष्टीमध्ये व शरीरांतर्गत बदल होत असून  सृष्टीमधील वनस्पती, पाणी यामध्ये निसर्गतः आम्लता वाढलेली असते. त्याचबरोबरीने ढगाळ वातावरण व वाहणारे वारे यामुळे शरीराअंतर्गत सुद्धा आम्लता व वातूळपणा वाढीस लागलेला असतो.
पावसाळ्यातील  आजार
        पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने आम्लता वाढल्यामुळे पित्त आणि आम्लपित्ता सारखे पोटाचे आजार, त्याचबरोबरीने उष्णता वाढून अंगावर पित्ताच्या गांधी उठणे, त्वचाविकार व सांध्यांना सूज येऊन सांधे दुखणे व सुजणे असे विविध वाताचे आजार, त्याचबरोबर अशुद्ध पाणी व गार हवा, ढगाळ वातावरणामुळे तापाचे विविध साथीचे आजार सहजपणे घडून येतात म्हणून पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घेणे अपेक्षित असते. त्यामुळे या काळात सात्विक आणि हलका आहार घेणे आवश्यक असते.
   
पावसाळ्यात काय खावे? 
       पावसाळ्यामध्ये अन्न ताजे व गरम खावे. जेवताना नेहमी  थोडीशी भूक राखून जेवावे. पावसाळ्यामध्ये आहारासाठी वापरले जाणारे धान्य हे जुने असावे.जुने धान्य पचायला हलके असते. त्यामुळे अम्लता सुद्धा वाढत नाही.पावसाळ्यामध्ये पिण्याचे पाणी आधी गाळून घ्यावे (अथवा   वॉटर  प्युरिफायर  मधून  शुद्ध केलेले) त्यानंतर ते शुद्ध पाणी  चांगले आटेपर्यंत  उकळून  घ्यावे.  नंतर ते  सामान्य  तापमानापर्यंत  थंड  होऊ द्यावे  व  दिवसभर तहानेप्रमाणे  पिण्यासाठी  व  जेवताना  पिण्यासाठी  वापरावे , उकळून थंड केलेले पिण्याचे पाणी हे पावसाळ्यामधील अमृत आहे असे म्हणावयाला हरकत नाही.

पावसाळ्यात काय खाऊ नये ?
        पावसाळ्यात काय खावे याबरोबर काय टाळावे हे देखील महत्त्वाचे आहे. शिळे पदार्थ, आंबवलेले पदार्थ , पचायला जड व मलबध्दता करणारे असतात. थंडगार अन्नपदार्थांचे सेवन करू नये.जेवणात हरबरा डाळीचे पदार्थ, चिवडा, फुटाणे अश्या कोरड्या व वातुळ पदार्थाचे सेवन पावसाळ्यात  करू नये.
तसेच  दिवसा शक्यतो झोपू नये. अशुद्ध गढूळ पाणी (ओढा नदीचे पाणी ), थंडगार पाणी, अजिबात पिऊ नये.या काळात सरळ अंगावर येणारा वारा, पाऊस, गारठा, यांच्या पासून स्वतःचा बचाव करावा
चिखलात, पावसात अनवाणी पायी चालु नये.
          वरील प्रमाणे आपण पावसाळ्यात आपले खाण्यापिणे आणि आचरण ठेवून होणाऱ्या विविध आजारापासून स्वतःचा बचाव नक्की करू शकतो, आणि आपले आरोग्य चांगले ठेऊ शकतो.

डॉ प्रमोद महाडिक
पोटविकार तज्ञ, विटा
मोबा. 9011261920

Post a Comment

0 Comments