Good News ' कोरोना ' ला गावच्या वेशीबाहेर रोखण्यात हिवतडच्या ग्रामस्थांना यश...

आटपाडी ( नंदकुमार कोळी)
           गेल्या  सहा महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्यात व आटपाडी तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु आहे. मात्र आटपाडी तालुक्यातील हिवतड ग्रामस्थांनी कोरोना विषाणुला गावाच्या वेशी बाहेर  रोखून धरण्यात मोठे यश मिळवले आहे. त्यांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.
          विटा- आटपाडी रस्त्यावरील भिवघाट पासून १२ किलो मिटर अंतरावर हिवतड हे सुमारे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. आटपाडी तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत ५७६ हून अधिक लोक कोरोनाबाधित झाले आहेत. या भीषण परिस्थिती मध्ये देखील हिवतड ग्रामस्थांनी सरपंच रुपाली सरगर यांच्या नेतृत्वाखाली कोरोना विषाणूला गावच्या वेशी बाहेर रोखून धरले आहे. सरपंच सौ.रुपाली उमाजी सरगर, ग्रामव्यवस्थापन समिती हिवतड, ग्रामीण  आरोग्य समिती हिवतड यांनी वेळीच केलेल्या उपाय योजना व कठोर निर्णयामुळे गेल्या सहा महिन्यात एकाही ग्रामस्थाला कोरोनाची बाधा झाली नाही.     
         याबाबत  अधिक माहिती देताना गावाचे पोलीस पाटील श्री अरुण सुतार यांनी असे सांगितले की, आम्ही बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांना सक्तीने १४ दिवसांसाठी विलागिकरण केले. त्यांची राहण्याची  सर्व व्यवस्था ग्रामपंचायत हिवतड यांनी केली होती. त्यामुळे गाव कोरोना मुक्त राहिले. याचे सर्व श्रेय ग्रामस्थांना व सोबत काम करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांना जाते असे मत सुतार यांनी व्यक्त केले. तसेच आगामी काळात देखील आणखी कठोर उपाययोजना राबवून गाव कोरोनामुक्त राखणार आहोत, असा विश्वास सरपंच सौ.रुपाली सरगर यांनी  व्यक्त केला आहे.
 

Post a comment

0 Comments