धाकट्या भावाच्या मृत्यूच्या धक्क्याने थोरल्या भावाने सोडले प्राण, अवघ्या काही तासात दोघांचा मृत्यू

: रामचंद्र आणि महादेव गडाळे बंधुची ९० वर्षानंतर ताटातूट 

पेठ ( रियाज मुल्ला)
          दोन सख्ख्या भावा-भावात वाद आणि एकमेकांना जीवे मारण्यापर्यंतच्या घटना समाजात पाहायला मिळतात. पण धाकट्या भावाच्या मृत्यूच्या धसक्याने थोरल्या भावाने आपले प्राण सोडल्याची हृदय हेलवणारी घटना घडली आहे. ह्या एकाच दिवशी घडलेल्या घटनेमुळे समस्त माणिकवाडी गावावर शोककळा पसरली आणि बाया बापुड्या माणसाच्या डोळ्यात पाणी तरळलं. भावा भावाना लाभलेला तब्बल ९० वर्षांचा दीर्घ प्रवास संपला.
           वाळवा तालुक्यातील महामार्गाच्या पश्चिमेला पेठ गावच्या कुशीत दडलेलं गाव म्हणजे माणिकवाडी. ही कहाणी आहे थोरले रामचंद्र दादू गडाळे (वय ९८)आणि महादेव दादू गडाळे (वय ९०) या जीवापाड प्रेम करणाऱ्या भावा भावांची. धाकट्या भावाच्या मृत्यूच्या धसक्याने थोरल्या भावाने आपली इहलोकी ची यात्रा रडत रडत आणि भावाच दुःख सांडत संपवली. चार दिवसापूर्वी रामचंद्र व महादेव हे दोघेही काही दिवसाच्या अंतराने बाथरूम मध्ये पाय घसरून पडले होते. दोघेही घरीच अंथरुणावर पडून होते. पाठीवर पाठ मारून आलेल्या भावाला झालेली दुखापत व वेदना महादेव यांना सहन झाल्या नाहीत. आपलं दुःख बाजूला ठेवत महादेव यांनी सकाळी अकराच्या सुमारास प्राण सोडले. तर धाकटा भाऊ गेल्याच्या दुःखात अश्रू सांडत रामचंद्र यांनी देखील सायंकाळी या जगाचा निरोप घेतला.आणि राम लक्ष्मणाची जोडी काळाच्या पडद्याआड झाली.
          गरिबी दोघांनी जवळून अनुभवली होती. परिस्थिती अत्यंत हलाखीची. परंपरागत मेंढपाळ चा व्यवसाय. रामचंद्र यांच्यासह चौघेजण. पण यांच बंधुप्रेम गावात नावाजण्या सारखं. त्यांनी अत्यंत धीराने पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय सांभाळत पाठच्या दोन्ही भावंडांना व मुलांना उच्च शिक्षण दिले. या दोघांची ही मुले आज पोलिस दलात व इंडियन नेव्हीत कार्यरत आहेत.
          दोघे बंधू नेहमी एकत्रितपणे विचाराने काम करत असत. मोठं आणि एकत्रित कुटुंब म्हणून परिसरात चर्चा होती. गावात सगळ्या बरोबर त्यांचे जिव्हाळ्याचा संबध होते .अगदी मरेपर्यंत सुद्धा ते एकमेकांना विसरले नाहीत. त्यांच्या एकाच दिवशी च्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. रामचंद्र आणि महादेव या दोघांचा एकाच दिवशी झालाला मृत्यू माणिकवाडी करांच्या जीवाला चटका लावून गेला.

Post a comment

0 Comments