जनताच आता... दोन्ही भाऊंना घरी बसवणार


स्वतःचा जीव धोक्यात घालून आजी माजी आमदारांकडून ' धाडसी 'लोकसेवा 
: अत्यावश्यक कामे वगळता कार्यालयातूनच जनतेचे प्रश्न सोडविण्याची कार्यकर्त्यांची मागणी 


सांगली ( राजेंद्र काळे)
        सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या लढ्यात सर्वाधिक चांगले काम कुठे झाले ? असे विचारले तर साहजिकच खानापूर मतदारसंघाचे नाव पुढे येते. त्याचे कारण ही तसेच आहे. आमदार अनिलभाऊ बाबर आणि माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांच्यासह अन्य नेतेमंडळीनी केवळ स्वतःचाच नव्हे तर आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून गेल्या चार महिन्यात धाडसी लोकसेवा केली. पण...आता कुठे तरी सबुरीने घेण्याची वेळ आली आहे. आज प्रत्येक दिवशी तालुक्यात १० ते १५ कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, अशा आणीबाणीच्या वेळी या दोन्ही ' तरुण ' नेत्यांनी अत्यावश्यक कामे वगळता अन्य सर्व कामांची  सूत्रे आपल्या कार्यालयातून हलवून लोकांना जास्तीतजास्त मदत करावी, अशी मागणी होत आहे. 

दोन्ही भाऊंचे काम कौतुकास्पद..
             हा लेख लिहिण्यामागे आमदार अनिलभाऊ आणि माजी आमदार सदाशिवभाऊ यांचे कौतुक करणे हा उद्देश मुळीच नाही. परंतु आज सांगली जिल्ह्यात एका बाजूला नेते मंडळी घराबाहेर पडत नाहीत अशी तक्रार असताना इथे मात्र वेगळी परिस्थिती आहे. आमदार बाबर यांच्या कुटुंबातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर, पुतणे हेमंत बाबर हे गेली चार महिने संकटात असलेल्या लोकांसाठी अहोरात्र झटत आहेत. दुसरीकडे सदाशिवभाऊ यांचे पूत्र माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, विशाल पाटील यांच्यासह नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी कोरोनाच्या संकटाची भिती न बाळगता घरोघरी जाऊन लोकांना जीवनावश्यक साहित्याची मदत आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. 
दोन्ही भाऊंचे कोरोना काळातील काम कौतुकास्पदच नव्हे तर सर्वांना अभिमानास्पद आहे.

तालुक्यात कोरोनाचा कहर..
         गेल्या काही दिवसांपासून खानापूर आणि आटपाडी तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. तालुक्यातील अनेक दिग्गजांना कोरोनाच्या संक्रमणामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. आजी माजी आमदारांच्या २४ तास संपर्कात असलेले काही कार्यकर्ते पाॅझीटीव्ह आल्यामुळे चिंतेचे वातावरण होते. सुदैवाने याचा फटका आजी माजी आमदारांच्या कुटुंबाला बसला नाही.खानापूर तालुक्यात १०० पेक्षा अधिक तर आटपाडी तालुक्यात १८८ पेक्षा अधिक रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत.अशा भीषण परिस्थितीत या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांचे वाढदिवस, उद्घाटन सोहळे, रक्षाविसर्जनचे कार्यक्रम यांना उपस्थिती लावणे धोक्याचे आहे. 

कार्यकर्त्यांनी संयम राखावा...
          कार्यकर्त्यांनी देखील आता थोडा संयम राखून अशा कार्यक्रमास उपस्थित राहण्यास नेतेमंडळीकडे हट्ट धरु नये. कारण कोरोनाचा गल्लीबोळापर्यंत आलेला वणवा आता घरोघरी पोहचायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आगामी दोन महिन्यात कोणतेही वाढदिवस, उद्घाटन सोहळे, वास्तुशांती किंवा सत्कार सोहळयाला नेत्यांनी उपस्थित राहू नये, अशी मागणी आता जनतेतून होत आहे. आजीमाजी आमदार यांनी देखील अशा सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर करावे. ज्यामुळे सोशल डीस्टनसिंग राखले जाईल, आपण, आपले कुटुंबिय आणि जनता देखील कोरोना पासून सुरक्षित राहील. 

हीच ती वेळ, मदत करण्याची..
          आजी माजी आमदारांनी कार्यालयात थांबून त्यांच्या कामाचा वेग शंभर पटीने वाढवावा. लोकांपुढे आता आरोग्य सेवा, रोजगार यासह शेकडो समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी अहोरात्र प्रयत्न करावे. लोकांना प्रत्येक अडचणीत मदत करावी, धीर द्यावा. परंतू आपण संकटाच्या या काळात वाढदिवस, सत्कार आणि उद्घाटन सोहळे करुन स्वतःताचा, कुटुंबाचा आणि लोकांचा जीव धोक्यात घालून नये. त्यामुळे हीच ती वेळ आहे, उद्घाटन, सत्कार सोहळे थांबविण्याची आणि लोकांना जास्तीतजास्त मदत करण्याची. 
.........................................................
चौकट 

         सामाजिक संस्थाचे काम नेत्रदीपक 
        विटा शहरातील आम्ही विटेकर संघटना, विट्याचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ, रोटरी क्लब, डाॅक्टरांची निमा संघटना यांच्यासह अनेक संघटनानी जीवनावश्यक वस्तूंचे केलेले वाटप आणि रक्तदान शिबिर ही निश्चित नेत्रदीपक कामगिरी आहे. समाजाला या संकटाच्या काळात आणखी मदतीची गरज आहे. परंतु या संघटनेच्या प्रत्येक सदस्यांने मास्कचा वापर करणे, सोशल डीस्टनसिंग पाळणे आणि अनावश्यक गर्दी न करणे यामाध्यमातून स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या आरोग्य रक्षणाला देखील प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

Post a comment

0 Comments