विट्यात उद्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड होणार ?विटा : रविवारी  शहरातील सर्व दुकाने बंद असल्यामुळे एका रिक्षाचालकाने चक्क रिक्षातून राख्यांचा फिरता स्टाॅल सुरू  केला होता.

विटा, प्रतिनिधी
       विटा शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे पालिका प्रशासनाने आठवड्यातील प्रत्येक रविवारी शहरातील सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज रविवारी संपूर्ण विटा शहरातील व्यवहार बंद राहिले. यामुळे आता रक्षाबंधनाच्या खरेदीसाठी उद्या सोमवारी मोठ्या प्रमाणात नागरिकांची झुंबड उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासन अलर्ट झाले आहे
         विटा शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नुकतेच  नगरपालिकेतील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरही  रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने विटा शहरातील  सर्व व्यवहार आठवड्यातून एकदा म्हणजेच रविवारच्या दिवशी पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सोमवारी रक्षाबंधनाचा सण आहे. तरी देखील प्रशासनाने आपला निर्णय कायम राखत आज रविवारी शहरातील संपूर्ण व्यवहार  बंद ठेवण्याचे  आदेश दिले होते.  त्यामुळे सोमवारी रक्षाबंधनच्या खरेदीसाठी  मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे
          सोमवारी रक्षाबंधनाच्या सणानिमित्त कापड पेठ, सराफ पेठ, भेटवस्तूची  तसेच इलेक्ट्रॉनिक दुकाने आणि यामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. राख्या खरेदी करण्यासाठी देखील महिलांची मोठी गर्दी होऊ शकते. परंतु अशी गर्दी झाल्यास शहराला कोरोनाचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो हे ओळखून पालिका प्रशासन चांगलेच अलर्ट  झाले आहे. रक्षाबंधन दिवशी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नका. सोशल डिस्टंसिंग चे पूर्णता पालन करा अन्यथा पालिका प्रशासनाला नाईलाजाने कारवाई करावी लागेल, असा इशारा पालिकेचे  मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी महासत्ता न्यूज पोर्टलशी बोलताना दिला आहे. नागरिकांनीदेखील शहरातील कोरोनाचा धोका ओळखून अनावश्यक  गर्दी टाळण्याचा  प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Post a comment

0 Comments