आम. पडळकरांच्या इशाऱ्यानंतर एसटी कामगारांच्या पगाराचा तिढा सुटला...पण
: इस्लामपूरातील आत्महत्या केलेल्या एसटी  कामगाराच्या कुटुंबाचे काय ?


इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे)
         राज्यातील एसटी कामगारांच्या  प्रलंबित वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा आ. गोपीचंद पडळकर यांनी  1 ऑगस्ट रोजी दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हा प्रश्न चारच दिवसात निकाली काढतो, असे आश्वासन कामगार संघटनेला दिले होते. आता हा प्रश्न सुटला आहे. नुकतेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामगारांच्या पगारासाठी 550 कोटी रुपये मंजूर केल्याचे जाहीर केले. परंतु  इस्लामपुरातील ज्या कामगाराने थकीत पगारासाठी आत्महत्या केली, त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मात्र शासनाने वाऱ्यावर सोडल्याचा धक्कादायक  प्रकार समोर आला आहे.
             इस्लामपुरातील कर्मचार्‍याची आत्महत्या...
     इस्लामपूर आगारातील अमोल धोंडीराम माळी वय 33 राहणार गोळेवाडी पेठ ता. वाळवा या मेकॅनिकने आर्थिक विवंचनेतून शुक्रवार 31 जुलै रोजी  आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार  समोर आला होता. राज्यभरातील सुमारे  एक लाख दहा हजार कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या चार महिन्यांपासून थकीत होते. अनेक कर्मचाऱ्यांना रोजंदारी कामावर जावे लागत होते. त्यामुळे आर्थिक विवंचना असलेल्या अमोल माळी यांनी शुक्रवार 31 जुलै रोजी आत्महत्या केली होती. याबाबत महासत्ता न्यूज पोर्टल ने बातमी दिल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती.
          आमदार पडळकर यांचा इशारा
       एसटी कर्मचारी माळी याच्या आत्महत्येनंतर प्रतिक्रिया देताना, राज्य शासनाने  एसटी कामगारांचे प्रलंबित वेतन तातडीने द्यावे, अथवा  सांगलीसह राज्यभरात जोरदार आंदोलन करणार आहोत, असा इशारा भाजपचे युवा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला होता. तर एसटी संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री  अजित दादा पवार यांनी देखील आपण हा प्रश्न लवकरात लवकर सोडवू  असे आश्वासन दिले होते. त्यामुळे एसटी कामगारांचा  प्रलंबित वेतनाचा प्रश्न कोण सोडवणार?  याकडे राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून होते.
       महामंडळाकडून 550 कोटी मंजुर
        उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या  निर्देशानुसार परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांच्या प्रलंबित वेतनासाठी तातडीने 550 कोटी रुपये मंजूर केल्याचे जाहीर केले आणि राज्यभरातील कामगारांनी सुटकेचा निश्वास सोडला.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिलेला शब्द पाळला म्हणून काही संघटनांनी अजित दादांचे स्वागत केले तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाचा खणखणीत  इशारा दिल्यामुळेच शासनाला  एसटी कामगारांचे चार महिन्यापासून पगार देणे भाग पडले असे सांगत काही कर्मचारी संघटनांनी आमदार पडळकर यांचे आभार मानले. अर्थात कोणाच्या का प्रयत्नाने असेना अखेर चार महिन्यापासून सुरू असलेल्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न मात्र मार्गी लागला, यामुळे कामगार वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.
           आत्महत्या केलेल्या कर्मचार्याच्या  कुटुंबाकडे  शासनाने फिरवली पाठ
       एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या चार महिन्यापासून थकित होते. कर्मचाऱ्यांची  आर्थिक विवंचना झाली होती. त्यामुळेच इस्लामपुरातील मेकॅनिकल आत्महत्या करून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे  कामगारांच्या वेतनाचा प्रश्न अधिक ज्वलंत होऊन हा प्रश्न शासनाला मार्गी लावणे भाग पडले. परंतु  इस्लामपूरातील  ज्या मेकॅनिकने पगारासाठी आत्महत्या केली त्या कर्मचाऱ्याकडे शासनाच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे.  आता पर्यन्त या  कुटुंबाची कोणत्याही लोकप्र्तिनिधिने साधी   विचारपूस देखील केली नाही. त्यामुळे अमोल माळी यांच्या आत्महत्येमुळे राज्यभरातील कामगारांच्या पगाराचा प्रश्न सुटला मात्र माळीच्या कुटुंबाचे पुढे काय? हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
          ' त्या ' कुटुंबाला वीस लाख रुपये द्यावेत
           अमोल माळी यांनी एसटीचे पगार वेळेत न मिळाल्यामुळेच आत्महत्या केली आहे. त्यामुळे शासनाने या कुटुंबाला तातडीने वीस लाखांची मदत करावी. तसेच एसटी महामंडळाच्या बँकेचे कर्ज पूर्णता माफ करावे, अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली असून आगामी काही दिवसात आपण या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मदत करणार असल्याचे आम. पडळकर यांनी सांगितले.     इस्लामपूर : पगार थकल्यामुळे आर्थिक विवंचनेतून  आत्महत्या केलेल्या अमोल माळी यांचे कुटुंब.Post a comment

0 Comments