चिखलहोळची मानसी म्हणते..' मला न्यायाधीश व्हायचंय ': उच्च पातळीच्या ' शुगर ' वर मात करत मानसीचे गोड यश
: मानसी म्हणते..' मला न्यायाधीश व्हायचंय '

सांगली, प्रतिनिधी
        दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. कोणी नव्वद टक्के गुण मिळवले तर कोणी शंभर टक्के गुण मिळत यशाला गवसणी घातली. मात्र खानापूर तालुक्यातील मानसीने उच्च पातळीच्या ' शुगर ' चा अडथळा दूर करत  दिवसातील केवळ  पाच तास अभ्यास करत 88 टक्के गुण मिळवले आहेत.  ' शुगर ' मुळे येणारा थकवा तिच्या चालण्या-बोलण्यात कुठेच दिसत नाही. उलट यापेक्षाही मोठं यश मिळवत मला ' न्यायाधीश व्हायचंय ' असा आशावाद तिने महासत्ता सांगली न्यूज पोर्टल्सशी बोलताना व्यक्त केला.
          गुणवत्तेच्या आड गरिबी, श्रीमंती, आजारपण किंवा  शारीरिक व्यंग असे काहीच येत नसतं.  अभ्यास करायची जिद्द आणि सातत्य असेल तर कोणत्याही यशाला  सहज गवसणी घालता येते, हे मानसी धुमाळ  हिने सिद्ध केले आहे. मानसी महेश धुमाळ ही खानापूर तालुक्यातील चिखलहोळ गावच्या जागृती  विद्यालयात शिक्षण घेत आहे.  तीन वर्षांपूर्वी वडील महेश यांचे दुःखद निधन झाले. या धक्क्यातून सावरत असतानाच तिला उच्चप्रतीची शुगर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एका बाजूला शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला औषधोपचार.  दररोजची इंजेक्शन आणि औषधे हाच नित्यक्रम.
        मानसी म्हणते शुगरचा त्रास असलेल्या पेशंटना प्रचंड थकवा येतो. काही करायला उत्साह राहत नाही. मात्र परिस्थितीवर मात करायची असेल तर चांगले शिक्षण घेणे गरजेचे आहे, हे मी ओळखले होते. त्यामुळे सकाळी शाळेत जाण्यापूर्वी आणि सायंकाळी शाळेतून आल्यानंतर असे चार ते पाच तास अभ्यासाला वेळ मिळत होता. शुगरचा त्रास असल्याने पुरेशी झोप घेणे गरजेचे असते. आरोग्य जपत आजारी न पडता परिक्षेला सामोरे जाण्याचे आव्हान होते. शाळेतील शिक्षक जयवंत काळे, मच्छिंद्रनाथ लोहार यांचे चांगले सहकार्य मिळाले. तसेच आजोबा सहदेव धुमाळ, आई मधुरा आणि चुलते प्रवीण धुमाळ यांचे लाख मोलाचे पाठबळ लाभले. त्यामुळेच आज मला हे यश पाहायला मिळाले. मी या सर्वांची नेहमीच ऋणी राहीन असे मत मानसी धुमाळ यांनी व्यक्त केले.
     
      मला न्यायाधीश व्हायचंय...
      मानसीचा उत्साह पाहून तुला भविष्यात काय व्हायची इच्छा आहे असे विचारले असता तिने आपल्याला न्यायाधीश व्हायचं असल्याचे सांगितले. कारण समाजातील सर्वसामान्य लोकांना चांगला आणि वेळेत न्याय देण्यासाठी न्यायाधीशाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे भविष्यात देखील मी आजारपणाची काळजी न करता पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे, असा आशावाद मानसी धुमाळ हिने व्यक्त केला.


Post a comment

0 Comments