सांगली जिल्ह्यात नवे २२ कोरोनाबाधित


सांगली जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नवे 22 रुग्ण आढळले. यामध्ये सांगलीतील 12 व मिरजेतील 2 आणि ग्रामीण भागातील 8 व्यक्‍तींचा समावेश आहे. एका माजी नगरसेवक पुत्राचा खासगी लॅबचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (corona positive) आला आहे. सांगलीतील एका कोरोनाबाधित डॉक्टरांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. कर्नाटकमधील कुडची व विजापूर येथील 2 व्यक्‍तींचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात बुधवारअखेर एकूण कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तींची संख्या 563 झाली आहे. त्यापैकी 289 व्यक्‍तींनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 260 व्यक्‍ती उपचाराखाली आहेत. त्यातील 9 व्यक्‍तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात मंगळवारअखेर मृत व्यक्‍तींची संख्या 14 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

सांगलीत बुधवारी 12 व्यक्‍तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. सांगलीतील संत रोहिदासनगर येथील 55 वर्षीय महिला, शंभरफुटी रस्ता कुदळे प्लॉटनजीक 32 वर्षीय महिला, एका कोरोनाबाधित खासगी डॉक्टरांची पत्नी, कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर येथील कोरोनाबाधित कुटुंबातील 3 महिला व दोन मुली, गुजरीबोळ पेठभागमधील बाधित कुटुंबातील 3 पुरुष यांचे चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. 

सांगलीतील एका माजी नगरसेवकांच्या मुलाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा अहवाल खासगी लॅबचा आहे. शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी त्यांचा स्वॅब घेतला आहे. ही व्यक्ती सांगलीत भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये दाखल आहे.

मिरज (Miraj) येथील एका खासगी रुग्णालयात कर्नाटकातून 57 वर्षीय पुरूष दाखल झाला होता. त्या बाधित पुरूषाचा मध्यरात्री मृत्यू झाला. त्याच रुग्णालयात काम करणार्‍या 32 वर्षीय नर्सचा  कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही नर्स मिरज-पंढरपूर रस्त्यावर मगदूम मळा परिसरात राहते. मिरज येथील मालगाव रस्ता परिसरातील  बाधित कुटुंबातील 28 वर्षीय  महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. 

चरण (ता. शिराळा) येथील 24 वर्षीय तरूण, सोनसळ (ता. कडेगाव) येथील 55 वर्षीय महिला, नागठाणे (ता. पलूस) येथील 62 वर्षीय पुरूष, वाळवा येथील 88 वर्षीय महिला, कानकात्रेवाडी (ता. आटपाडी) येथील 35 वर्षीय महिला व 20 वर्षीय तरूण, नेवरी (ता. कडेगाव) येथील 48 वर्षीय महिला, उमदी (ता. जत) येथील 38 वर्षीय पुरूष यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. 

Post a comment

0 Comments